नागपूर : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ८ ते १२ च्या शाळा जुलै महिन्यात सुरू झाल्या. तर ५ ते ७ वर्गाच्या शाळा सुरू होऊन १५ दिवस लोटले. असे असतानाही अद्यापपर्यंत शासनाकडून गणवेशाबाबत कुठलेही नियोजन नसल्याचे दिसते आहे.
समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत जि.प. शाळेमध्ये शिकणाऱ्या वर्ग १ ते ८ च्या एससी, एसटी, बीपीएल प्रवर्गातील मुले तसेच सर्व मुलींना मोफत गणवेश दिल्या जाते. जिल्ह्यात १५३० वर जिल्हा परिषदेच्या शाळा आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे अद्यापपर्यंत वर्ग १ ते ४ च्या शाळा सुरू झाल्या नाही. पण ५ ते ८ चे वर्ग सुरु झाले आहेत. विद्यार्थ्यांच्या प्रत्येकी एका गणवेशासाठी ३०० रुपयाप्रमाणे ६४ हजार २९३ लाभार्थी विद्यार्थ्यांकरिता ३.८५ कोटी ७५ हजार ८०० रुपयांचा निधी शासनाकडून गणवेशाकरिता अपेक्षित आहे.
पीएफएमएस प्रणालीद्वारे जमा होणार गणवेशाचे अनुदान
यापूर्वीपर्यंत सर्व शाळांचे विविध बँकांमध्ये खाते असल्याने निधी वळता झाल्यानंतरही तो शाळांच्या खात्यामध्ये पोहचण्यास विलंब होत असल्याचे सूत्रांचे म्हणने आहे. त्यामुळे आता केंद्र शासनाने सर्व शाळांना पूर्वीचे सर्व बँकेतील खाते बंद करुन बँक ऑफ महाराष्टमध्ये शाळांचे खाते उघडण्याचे निर्देश दिले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील जवळपास ९९ टक्के शाळांचे खाते उघडण्याचे काम पूर्णत्वास आल्याचे शिक्षण विभागाचे म्हणणे आहे. त्यानंतर शासनाकडून ‘पीएफएमएस’ प्रणालीव्दारे शाळांच्या खात्यावरच जमा होईल असे सांगण्यात येत आहे.
तालुकास्तरावर प्रत्येक गट शिक्षणाधिकाऱ्यांना त्यांच्या तालुक्यातील शाळानिहाय विद्यार्थ्यांची माहिती मागविण्यात आली आहे. लवकरच शासनाकडून गणवेशाचा निधी येणे अपेक्षित आहे.
- प्रमोद वानखेडे, सहायक कार्यक्रम अधिकारी, समग्र शिक्षा अभियान, जि.प.