लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाची तिसरी लाट लहान मुले व बालकांसाठी घातक ठरू शकते, असे संकेत वैद्यकीय तज्ज्ञांकडून मिळत आहे. त्यात म्युकरमायकोसिसचा वाढता प्रकोप पाहता जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी ग्रामीण भागात कोरोनाबाबत जनजागृती करण्याचे निर्देश पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांनी दिले. वैयक्तिक स्वच्छता व कोविड अनुषंगिक जीवनशैली वर्तनासाठी शिक्षक चांगल्या पद्धतीने काम करू शकतात. माहिती-प्रबोधनाद्वारे ते नागरिकांना प्रोत्साहन देऊ शकतात. सध्या शाळा बंद असल्याने शिक्षकांना जागृतीचे काम देण्यात यावे. कोविड संबंधित कार्यात सध्या कार्यरत असणाऱ्या शिक्षकांव्यतिरिक्त उपलब्ध शिक्षकांना हे काम द्यावे. ज्या गावात शिक्षक शिकवितात त्याच गावात त्यांना प्रबोधनाचे काम देण्याची सूचना केदार यांनी केली.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कोविड आढावा बैठकीत सोमवारी ते बोलत होते. यावेळी अध्यक्षा रश्मी बर्वे, उपाध्यक्ष मनोहर कुंभारे, सदस्य अवंतिका लेकुरवाळे, समीर उमप, दुधाराम सव्वालाखे, कैलास राऊत, अप्पर जिल्हाधिकारी शिरीष पांडे, निवासी उपजिल्हाधिकारी अविनाश कातडे उपस्थित होते.
कोविड आढावा बैठकीनंतर महाराष्ट्र पशुविज्ञान विद्यापीठ (माफसू)मध्ये फुटाळा तलावातील पाणी पूर्ववत करण्याबाबत त्यांनी माफसूचे कुलगुरू डॉ. आशिष पातुरकर, महानगरपालिकेच्या अभियंता श्वेता बॅनर्जी व मेट्रोच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली.