नागपूर : ‘ब्रेन हॅमरेज’ झालेल्या ५२ वर्षीय व्यक्तीवर उपचार सुरू असताना डॉक्टरांनी ‘ब्रेन डेड’ झाल्याचे घोषित केले. कुटुंबावर शोककळा पसरली. त्या दु:खातही पत्नीसह कुटुंबातील सदस्यांनी अवयवदानाचा निर्णय घेतला. या मानवतावादी निर्णयामुळे दोघांना नवे आयुष्य मिळाले. विशेष म्हणजे, दाता एलआयसी एजंट होते. त्यांच्या या दानाने ‘जिंदगी के साथ... जिंदगी के बाद भी’ ही टॅगलाईन खरी ठरली.
न्यू बिडीपेठ येथील रहिवासी असलेले दिनेश भागवतकर त्या अवयवदात्याचे नाव. ९ एप्रिल रोजी रात्री भागवतकर यांना अचानक डोकेदुखी, उलट्यांसह, छातीत दुखायला लागले. त्यांना लागलीच जगनाडे चौकातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. ‘ब्रेन हॅमरेज’ असल्याचे निदान केले. उपचार सुरू असताना हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या एका पथकाने ‘ब्रेन डेड’ म्हणजे मेंदू मृत झाल्याची माहिती दिली. कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. डॉक्टरांनी त्यांना अवयवदान करून आपल्या माणसाला जिवंत ठेवण्याचा सल्ला दिला. त्या दु:खातही भागवतकर यांच्या पत्नी सुजाता, मोठा भाऊ प्रशांत यांनी अवयवदानासाठी होकार दिला.
याची माहिती, ‘झोनल ट्रान्सप्लान्ट कोऑर्डिनेशन सेंटर’चे (झेडटीसीसी) अध्यक्ष डॉ. संजय कोलते व सचिव डॉ. राहुल सक्सेना यांना देण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनात झोन समन्वयक वीणा वाटोरे यांनी पुढील प्रक्रिया पूर्ण केली. त्यांचे यकृत, दोन्ही मूत्रपिंड व बुबूळ दान करण्यात आले. एक मूत्रपिंड (किडनी) सावंगी वर्धा येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयातील रुग्णालयाला तर दुसरी किडनी र. र. मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमधील रुग्णाला देण्यात आली. ‘कॉर्निया’ची जोडी माधव नेत्रपेढीला दान करण्यात आली.
- रिकाम्या हाताने परतले चेन्नईचे पथक
भागवतकर यांचे एक यकृत चेन्नई येथील रुग्णाला देण्यात येणार होते. त्यासाठी चेन्नई येथील यकृत प्रत्यारोपण शल्यचिकित्सक डॉ. रजनीकांत पॅचा, डॉ. शिवनेसन, डॉ. नीरज सावळाखे आणि चमू नागपुरात पोहचली. त्यांनी यकृताची तपासणी केली असता, ते वैद्यकीयदृष्ट्या फिट नसल्याचे आढळून आले. यामुळे या पथकाला रिकाम्या हाताने परतावे लागले. या महिन्यातील ही दुसरी घटना आहे.
- अवयवदानाची शंभरी गाठण्यासाठी लागली १० वर्षे
नागपुरात अवयवदानाला २०१३ मध्ये सुरुवात झाली. गुरुवारी झालेले अवयवदान १०२ वे ठरले. अवयवदानाची शंभरी गाठण्यासाठी तब्बल १० वर्षे लागली. विशेष म्हणजे, दर आठवड्याला शासकीयसह खासगी रुग्णालयात एक ब्रेन डेड रुग्ण आढळून येतो. परंतु रुग्णाच्या नातेवाइकांना अवयवदानाचा सल्ला दिला जात नसल्याने ‘झेडटीसीसी’मध्ये त्याची नोंदच होत नसल्याचे वास्तव आहे.