फेब्रुवारीपासून वेतन नाही : १५ हजार कर्मचाऱ्यांना फटकानागपूर : जिल्हा परिषदेच्या विविध विभागप्रमुखांच्या वेळकाढू धोरणाचा फटका १५ हजार कर्मचाऱ्यांना बसत आहे. दोन महिन्यांपासून वेतन न झाल्याने सेवानिवृत्तीधारक कर्मचाऱ्यांची फरफट होत आहे. जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे वेतन दर महिन्याला १ ते ५ तारखेदरम्यान जमा केले जाते. पण, काही कर्मचाऱ्यांचे फेब्रुवारीचे तर काहींचे मार्चचे वेतन अद्याप झालेले नाही. जिल्हा परिषदेचे एकूण १० हजार नियमित कर्मचारी तर ५,५०० सेवानिवृत्तीधारक कर्मचारी आहेत. नियमितपणे वेतन होत नसल्याने कर्मचाऱ्यांना बँकेचे कर्जाचे हप्ते, मुलांच्या शाळेची फी, महिन्याचा किराणा व इतर खर्च करताना विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. आर्थिक वर्ष संपत असल्याने मार्च महिन्याचा पगार दरवर्षीच उशिराने होतो. मात्र, यंदा फेब्रुवारी महिन्याचाच पगार एप्रिल महिना अर्धा संपत असताना झालेला नाही. परिणामी कर्मचाऱ्यांना विविध आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. सर्वाधिक अडचण पेन्शनधारक कर्मचाऱ्यांची होत आहे. महिन्याकाठी ठरलेला औषधांचा व कुटुंबाचा खर्च करायचा कुठून, असा प्रश्न निर्माण झाला आहे. पेन्शनधारक जिल्हा परिषदेच्या पायऱ्या झिजवीत आहेत. (प्रतिनिधी)
जि.प. कर्मचाऱ्यांना वेतनाची प्रतीक्षा
By admin | Published: April 16, 2016 2:27 AM