आरोग्य विभागाने लक्ष ठेवण्याच्या दिल्या सूचना : अहमदाबादमध्ये तिघांना लागण लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : दक्षिण अमेरिकन राष्ट्रांमध्ये दहशत पसरविणाऱ्या झिका विषाणू (व्हायरस) रुग्ण भारतातही आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. अहमदाबादमधील बापूनगर परिसरात तीन रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये एका गर्भवती महिलेचाही समावेश आहे. याची गंभीर दखल घेत सार्वजनिक आरोग्य विभागाने आपल्या सर्व रुग्णालयांना ‘अलर्ट’ दिला असून, विशेषत: स्त्री रुग्णालयांना याकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना दिल्या आहेत. अहमदाबाद येथील बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेत झिका व्हायरसची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पुण्यातील ‘नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ व्हायरालॉजी’ येथेही आरटी-पीसीआरची पुन्हा एकदा चाचणी घेऊन याबाबत खात्री करून घेण्यात आल्याचे आरोग्य खात्याचे म्हणणे आहे. याबाबत अधिक माहिती देताना सार्वजनिक आरोग्य विभागाचे संचालक डॉ. सतीश पवार यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, सध्या सतर्क राहण्याची गरज आहे. झिका आणि डेंग्यूचे विषाणू एकच आहेत. त्यामुळे झिकाची लागण होणे शक्य आहे. ही आहेत लक्षणे झिका व्हायरसची लक्षणे इतर ‘फ्लू’सारखीच आहेत. यात सौम्य ताप, डोळे लाल होणे, डोकेदुखी, अंगावर रॅशेस येणे अशी लक्षणे दिसून येतात. डासाच्या दंशानंतर किमान दोन ते सात दिवसांमध्ये ही लक्षणे आढळून येतात. या व्यक्तींना सर्वाधिक धोका मधुमेह, हृदयविकार आणि यकृतांचे विकार असलेल्या रुग्णांना या रोगाचा धोका अधिक असतो. सोबतच ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी आहे, वयोवृद्ध, गर्भवती व लहान मुलांना याचा संसर्ग अधिक होऊ शकतो. एडिस जातीच्या डासाने पसरतो विषाणू एडिस जातीच्या डासाने पसरणारा हा एक आजार आहे. या जातीच्या डासाच्या दंशामुळे डेंग्यू आणि चिकनगुनियादेखील पसरतो.
झिका विषाणू, नागपुरात ‘अलर्ट’
By admin | Published: May 28, 2017 2:01 AM