ZP Election 2020 : उपराजधानीत शिवसेनेची घसरगुंडी; भाजपाची 'मंदी' अन् काँग्रेसची मुसंडी!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2020 03:22 PM2020-01-08T15:22:28+5:302020-01-08T15:32:18+5:30
नागपूर जिल्हा परिषदेत शिवसेनेने स्वबळावर निवडणूक लढवली
मुंबई : राज्यात शिवसेनेच्या नेतृत्वाखाली काँग्रेस-राष्ट्रवादीची ‘महाविकास आघाडी’ सत्तेत असली तरी नागपूर जिल्हा परिषदेत मात्र शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीपासून दूर राहत स्वतंत्र उमेदवार उभे करून स्वबळाचा नारा दिला. मात्र, या निवडणुकीत शिवसेनेची घसरगुंडी झाल्याचे दिसून येत आहे.
नागपूर जिल्हा परिषदेत गेल्या काही वर्षांपासून भाजपा व त्यांच्या मित्रपक्षाची सत्ता होती. भाजपाच्या मित्रपक्षात शिवसेनेचाही समावेश होता. मात्र, विधानसभा निवडणुकीनंतर भाजपा- शिवसेनेची युती तुटली आणि काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना अशी महाविकास आघाडी तयार होऊन त्यांचे राज्यात सरकार आले. त्यानंतर नागपूर जिल्हा परिषदेत शिवसेनेने स्वबळावर निवडणूक लढवली. पण, शिवसेनेला या निवडणुकीत म्हणावे, तसे यश मिळवता आले नाही.
जिल्हा परिषदेतील शिवसेनेचे 2012 मधील पक्षीय बलाबल पाहिले असता शिवसेना 8 जागा मिळाल्या होत्या. मात्र, या निवडणुकीत शिवसेनेला फक्त एकाच जागेवर समाधान मानावे लागले आहे. तर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने भाजपाला धक्का देत आतापर्यंत 38 जागांवर विजय मिळविला आहे. काँग्रेसने 26 तर राष्ट्रवादीने 12 जागांवर विजय मिळविला आहे. भाजपा 10 जागावर विजयी झाली आहे. तर एका जागेवर शेकापला विजय मिळाला आहे.
याचबरोबर, या निवडणुकीत भाजपाचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना धक्का बसला आहे. नितीनगडकरींचे मूळ गाव धापेवाडा येथून काँग्रेसचे महेंद्र डोंगरे विजयी झाले आहेत. तर बावनकुळे यांच्या कोराडी जिल्हा परिषद सर्कलमधून काँग्रेसचे उमेदवार नाना कंभाले विजयी झाले आहेत.
काही केंद्रांवर बीयू व सीयूमध्ये बिघाड
मतदानावेळी जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील एका मतदान केंद्रावर सीयू (कंट्रोल युनिट), सावनेर तालुक्यातील तीन मतदान केंद्रावर बॅलेट युनिट व एक कंट्रोल युनिट, कळमेश्वरमधील एका मतदान केंद्रावर बॅलेट युनिट, रामटेकमधील प्रत्येकी दोन मतदान केंद्रावर बॅलेट व कंट्रोल युनिटमध्ये बिघाड झाल्याने, ते बदलविण्यात आले. तर कामठी व भिवापूर तालुक्यातील प्रत्येकी एका मतदान केंद्रावर अनुक्रमे एक बॅलेट युनिट व कंट्रोल युनिटमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मतदानावेळी ते बदलविण्यात आले.