नागपूर : जिल्हा परिषदेची पोटनिवडणूक येत्या मंगळवारी होणार आहे. त्यामुळेच सर्वच पक्षांच्या वरिष्ठांसह पदाधिकारी प्रचारात व्यस्त आहेत. जिल्हा परिषदेच्या १६ जागेकरिता ७९ उमेदवार रिंगणात आहेत तर पंचायत समितीच्या ३१ जागांकरिता १२५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
जिल्हा परिषदेला मिनी मंत्रालयाचे स्वरुप प्राप्त आहे. ग्रामीण विकासाचा कणा म्हणून जि.प.ची ओळख असल्याने ही निवडणूक नागरिकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. निवडणुकीला काहीच दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे, काँग्रेस, भाजप आणि शिवसेनेचे सर्वच उमेदवर आपआपल्या मतदारसंघात तयारीला लागले असून प्रचार शिगेला पोहचलाय. आता या रणधुमाळीत मतदार कोणाला निवडून देतात, कुणाला किती जागा मिळेल, हे ६ ऑक्टोबरलाच स्पष्ट होईल.
तिरंगी लढत
नागपूर जिल्हा परिषदेच्या १६ आणि पंचायत समितीच्या ३१ जागांवर शिवसेना पोटनिवडणूक लढवणार आहे. जिल्हा परिषदेच्या १२ सर्कलमध्ये शिवसेनेनं उमेदवार उभे केले आहेत. आघाडी करण्याबाबतच्या प्रस्तावाला राष्ट्रवादी काँग्रेसने उत्तर न दिल्यामुळे दोन महिन्यांपूर्वीच शिवसेनेने स्वबळाचा नारा दिला होता. तर काँग्रेस- राष्ट्रवादीने एकत्र लढण्याची घोषणा स्थानिक पातळीवर केली आहे. त्यामुळे शिवसेना, भाजप आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी अशी तिरंगी लढत नागपुरात पाहायला मिळेल.