नागपूर : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा शुक्रवार २२ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता आबासाहेब खेडकर सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन दिवसांपासून सत्ताधारी-विरोधकांच्या बैठका सुरू असल्याने ही सभा वादळी ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या सहा महिन्यांनंतर जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा प्रत्यक्ष सभागृहात होत आहे. जुलै महिन्यात सभा पार पडली. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये पार पडलेली सभा ऑनलाइन होती. त्यात विरोधकांनी बहिष्कार घातला होता. आता सत्ताधाऱ्यांना एक वर्ष पूर्ण झाले आहे. शिवाय प्रत्यक्ष सभागृहात सभा होणार असल्याने विरोधक अधिक आक्रमक राहणार असल्याचे सांगितले जाते. विरोधकांसह सत्ताधारी सदस्यांच्या फायली निकाली निघत नसल्याने सदस्यांमध्ये नाराजी आहे. त्याचे प्रतिबिंब सभेत उमटण्याची शक्यता आहे. तसेच १५ व्या वित्त आयोगाचा निधी आल्यानंतरही वितरित झाला नाही. निधीअभावी ग्रामीण भागातील विकासकामे रखडलेली आहेत, अतिवृष्टीत झालेली नुकसानभरपाई शेतकऱ्यांना अद्याप मिळाली नाही. शिक्षण विभागात झालेल्या भ्रष्टाचाराची थातूरमातूर झालेली चौकशी, गत काही दिवसांत एसीबीच्या जाळ्यात अडकत असलेले अधिकारी, आरोग्य विभागासह पशुसंवर्धन विभागातील भ्रष्टाचारावर वित्त समितीने दिलेले चौकशीचे आदेश, गणवेश वाटपात पदाधिकाऱ्यांकडून होणारा हस्तक्षेप, अंगणवाड्यांमधील दुरवस्था, जि.प. निधीत असलेला ठणठणाट आदी मुद्द्यांवर विरोधी पक्षांसह सत्तापक्षातील सदस्यही आक्रमक होणार असल्याची चर्चा आहे.