नागपूर : दोन दिवसात नागपूर जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. बुधवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे हिंगणा तालुक्यात अनेक गावांतील पूल, रस्ते व पाणंद रस्ते वाहून गेले. गावातील लोकांचा बाहेर जाण्यास संपर्क तुटला. पिकांचेही मोठे नुकसान झाले. शासनाने नुकसानीचा सर्वे करून शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मुक्ता कोकड्डे व उपाध्यक्ष कुंदा राऊत यांनी केली. अध्यक्षा, उपाध्यक्षा यांनी गुरुवारी नुकसानग्रस्त गावांचा दौरा केला.
अतिवृष्टीमुळे हिंगणा तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या पेंढरी देवळी, किरमिटी भारकस, खडकी, सुकळी,बेलदार ,बीड गणेश पूर, टाकळघाट, मधील ओम नगर आदी गावांत अध्यक्षा, उपाध्यक्षांनी पाहणी केली. कृषी विभागाचे अधिकारी, ग्रामसेवक व तलाठी आदींना संयुक्त सर्वे करुन जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अहवाल पाठविण्याची सूचना केली.
२०२२- २०२३ मधील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या गावांतील रस्ते, पूल, नाले दुरुस्तीसाठी जि. प. ला शासनाने निधी दिला असता तर नदी, नाले खोलीकरण, पूल व रस्त्यांची दुरुस्ती झाली असती. तर इतक्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले नसते. आता तरी शासनाने शेतकऱ्यांचा अंत पाहू नये, त्यांना तातडीने मदत द्यावी, अशी भूमिका मुक्ता कोकड्डे व कुंदा राऊत यांनी मांडली. पाहणीदरम्यान जि. प. सदस्य संजय जगताप, आतिश उमरे दिनेश बंग, उज्ज्वला बोढारे ,पं. स. सभापती सुषमा कावळे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.