सर्व आरोपींवर गंभीर गुन्हे दाखल : डीसीपी संजय लाटकर यांची माहितीनागपूर : शहर पोलिसांनी सदर परिसरातील नवी वस्ती गोवा कॉलनी येथील ‘जुम्मन’ चौरसिया गँगवर मोका अंतर्गत कारवाई केली. त्यामुळे आता शहरात एकूण १० टोळीविरुद्ध मोकाची कारवाई झाली आहे.कुख्यात राजू ऊर्फ जुम्मन बिलमोहन चौरसिया (४६) रा. नवी वस्ती मंगळवारी, सय्यद फिरोज सय्यद नूर (३३) रा. गोवा कॉलनी, सय्यद नौशाद सय्यद कलीम (२१) रा. गोवा कॉलनी, राकेश ऊर्फ निक्की अशोक गेडाम (३४) रा. पाटणकर चौक, आणि राजा खान वल्द राजा अबदुल गफार (२४) रा. गोवा कॉलनी अशी आरोपीची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती देतांना परिमंडळ-२ चे डीसीपी संजय लाटकर यांनी सांगितले की, परिमंडळ-२ अंतर्गत मोकाची ही तिसरी कारवाई आहे. यापूर्वी जरीपटका पोलीस ठाणे हद्दीतील भुल्लर गँगविरुद्ध एकाच दिवशी दोन कारवाई करण्यात आली होती.महिन्याला खंडणीची मागणीनागपूर : ८ मार्च रोजी रात्री ११.३० वाजता बॉबी अनिल भैनवर (२०) रा. नवी वस्ती मंगळवारी आणि त्याचा मित्र छोटू तागडे हे एका कार्यक्रमातून परतले होते. दरम्यान मंगळवारी बाजार मनपा उद्यानाजवळ बॉबी आणि छोटूने गुन्हेगार फिरोजच्या पानठेल्यापासून थोड्या अंतरावर लघुशंका केली. यानंतर जुम्मन गँगच्या आरोपींनी दोन्ही तरुणाला पकडून बळजबरीने बाईकवर बसविले. मनपाच्या बगिच्यात त्यांना नेऊन गंभीर जखमी केले. तसेच मिनरल वॉटर व्यापारी छोटूला व्यापार करण्यासाठी दर महिन्याला ५ हजार रुपये खंडणी मागितली. या प्रकरणात आरोपींना अटक करण्यात आली होती. या गँगचे मागचे रेकॉर्ड पाहून त्यांच्यावर मोकाची कारवाई करण्यात आली. फिरोजला २०१४ मध्ये तडीपारही करण्यात आले होते. डीसीपी लाटकर यांनी सांगितले की, अपहरण, खंडणी मागणे व हल्ला करणे या प्रकरणात शनिवारी न्यायालयाने आरोपींना एमसीआरवर तुरुंगात पाठविले. परंतु सोमवारी पोलीस प्रॉडक्शन वॉरंटवर या आरोपींना मोकाच्या विशेष न्यायालयापुढे सादर करेल. या गँगचे गड्डीगोदाम येथील मस्ते टोळीसोबत काही संबंध आहेत का, याचाही शोध घेतला जात आहे. (प्रतिनिधी)आरोपींचे अवैध धंदे या गँगच्या काही सदस्यांमार्फत गोवा कॉलनीतील रेल्वे लाईनच्या जागेवर जुगार अड्डा चालविला जात असल्याची माहिती आहे, तर जुम्मन हा घर खाली करण्याचे काम करीत असल्याचीही चर्चा आहे. ताजा प्रकरणात फिर्यादी बॉबी भैनवर हा आरोपी राजू ऊर्फ जुम्मनचा नातेवाईक असल्याचे सांगितले जाते. घटनेपासून मिनरल वॉटर वितरक छोटू तागडे दहशतीत असल्याचे सांगितले जाते. आरोपी राजा काही दिवसांपूर्वीच रेल्वेच्या एका प्रकरणातून पाच महिन्याची शिक्षा भोगून परत आला आहे.
‘जुम्मन’ चौरसिया गँगवर मोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2016 3:15 AM