नांदेड : शाळाबाह्य अनियमित व स्थलांतरित बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात दाखल करून त्यांचे शिक्षण अबाधित राखण्यासाठी जिल्ह्यात १७ ते ३१ ऑगस्टदरम्यान जिल्हाभर सर्वेक्षण करण्यात आले. पण, नांदेड जिल्ह्याचा विद्यार्थी गळती दर ०.५६ टक्के असल्याने जिल्ह्यात अनियमित स्थलांतरित काही मुले सापडतील; पण कोणत्या मुलांना शाळाबाह्य म्हणायचे, असा पेच सर्वेक्षण करणाऱ्या यंत्रणेला पडला आहे.
शिक्षण हक्क कायद्यानुसार प्रत्येक मुलांना शिक्षण घेण्याचा हक्क आहे. कामानिमित्त गावखेड्यातून अनेक कुटुंब शहराच्या ठिकाणी स्थलांतरित होतात, अशा कुटुंबातील मुलांच्या शिक्षणामध्ये खंड पडतो. इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत एकही विद्यार्थी नापास होऊ नये, अशी शासनाची संकल्पना असल्याने शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध कसा घेतला जाणार असाही प्रश्न आहे. जिल्ह्यात शिक्षण विभागाने ३ ते १८ वयोगटातील बालकांचे सर्वेक्षण या कालावधीत केले आहे.
शाळाबाह्य मुलांचा शोध घेण्यासाठी तालुकास्तरावर, वाॅर्डस्तरावर व केंद्र व गावस्तरावर समिती गठित केली होती. अनियमित व स्थलांतरित मुलांचा शोध घेऊन त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ही मोहीम राबविण्यात आली. मात्र, यात शाळाबाह्य नसलेली किती मुले सापडतील, हे अहवाल आल्यानंतरच समोर येईल. जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या २१९६, तर खासगी अशा सर्व माध्यमांच्या ३७१९ शाळा आहेत. त्यात इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत २ लाख १००० विद्यार्थी शिक्षण घेतात.
जिल्ह्याची शाळाबाह्य मुक्तीकडे वाटचालइयत्ता पहिली ते आठवीपर्यंत विद्यार्थी नापासच होत नाही, त्यामुळे विद्यार्थी पटसंख्याही चांगली आहे. त्याचा परिणाम गळतीचे प्रमाण नगण्य असल्याने शाळाबाह्य मुले सापडत नसल्याने जिल्ह्याची शाळाबाह्य मुक्तीकडे वाटचाल सुरू असल्याचे दिसून येते.
१०५४ मुलांचे स्थलांतर रोखलेगतवर्षी करण्यात आलेल्या सर्वेक्षणात आढळलेल्या जिल्ह्यातील १०५४ शाळाबाह्य मुलांचे स्थलांतर शिक्षण विभागाने रोखले आहे. त्यात मुदखेड, कंधार व नायगाव या तालुक्यातील सर्वाधिक मुले आहेत. जिल्ह्यात ३९४ बालरक्षक आहेत.