नांदेड: माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी नांदेड जिल्ह्यासाठी घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांपैकी नांदेड ते बासर हा सुमारे १०० किलोमिटर लांबीचा प्रकल्प मार्गी लागला असून, या प्रकल्पास आशियाई विकास बॅंकेचे अर्थसहाय्य नुकतेच मंजूर झाले आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांनी संपूर्ण महाराष्ट्रात आशियाई विकास बँकेच्या अर्थसहाय्याने तीन टप्प्यात १५ हजार कोटी रूपयांचा रस्ते विकास कार्यक्रम राबविण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्या टप्प्यात ५,६८९.३३ कोटी रुपये इतक्या अंदाजित किंमतीची २९ कामे करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. त्यामध्ये नांदेड जिल्ह्यातील नांदेड ते बासर राज्य सीमा व भोकर ते रहाटी राज्य सिमेपर्यंतच्या सिमेंट काँक्रिट मार्गाचा समावेश आहे.
प्रमुख जिल्हा मार्ग ८३ अंतर्गत नांदेड ते बासर या सुमारे ९९ किलोमिटर लांबीच्या प्रकल्पात नांदेड येथील निळा जंक्शन, शंकरराव चव्हाण चौक, गाडेगाव, ब्राह्मणवाडा, मुगट, आमदुरा, वासरी, शंखतिर्थ, माळकौठा, बळेगाव, कारेगाव फाटा, बाभळी फाटा, धर्माबाद ते बासर राज्य सिमेपर्यंतच्या रस्त्याचे काम केले जाणार आहे. तर राज्य महामार्ग क्र. ६१ अंतर्गत भोकर, रहाटी ते राज्य सीमा या २३ किलोमिटर लांबीच्या रस्त्याचे काम होणार आहे. माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी या दोन्ही रस्त्यांचा आशियाई विकास बॅंकेच्या अर्थसहाय्याने होणाऱ्या योजनेत समावेश केला होता.