किनवट : सलग चार वर्षांपासून किनवट तालुक्यात दुष्काळी परिस्थिती असून निसर्गाच्या लहरीपणामुळे पिकाचा उतारा घटून शेतकरी कर्जाच्या खाईत ढकलला गेला आहे़ त्यामुळे गत चार वर्षांत १११ शेतकºयांनी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केली आहे़किनवट तालुक्यात सलग चार वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे महागामोलाचे बियाणे वाया जात आहे़ कर्जमाफीचेही तालुक्यात तीनतेरा वाजले आहेत. पेरणीसाठी मिळणारे पीककर्ज पेरणीनंतर मिळू लागले. खरीप हंगामाचे कसेबसे पीक घरात येत आहे़ मात्र पीककर्जासाठी शेतकरी आजही बँकेच्या रांगेत उभे आहेत़ ऐन पेरणीच्या काळात शेतकºयांना बी बियाणे खरेदीसाठी व्याज दिडीदुपटीने खाजगी कर्ज काढण्यात येत आहे़ दरवर्षी खरीप हंगामात पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होतो, त्यातच निसर्गाची अवकृपा ही किनवट तालुक्यातील शेतकºयांच्या पाचवीला पुंजली आहे़ म्हणूनच की काय, गेल्या चार वर्षांत १११ शेतकºयांनी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केली आहे.आघाडी सरकारच्या काळात म्हणजे २००९ ते २०१३ या कालावधीत ६६ शेतकºयांनी आत्महत्या केल्याची नोंद आहे़ तर महायुतीच्या काळात या आकड्याने शंभरी पार केली आहे़
- किनवटचे आ. प्रदीप नाईक म्हणाले, शासनाचे धोरण हे शेतकरीविरोधी आहे. कर्जमाफीची घोषणा फसवी आहे. या शासनाच्या काळात शेतकºयांच्या उत्पादित मालाला योग्य भाव मिळत नाही. पीकविम्यात दुजाभाव होत असून शेतकºयांचा उत्पादित माल वेळेवर खरेदी होत नाही. उल्लेखनीय म्हणजे, कधी नव्हे ते यावर्षी ऐन दिवाळीत भारनियमन लादल्या गेले हे शासनाचे मोठे अपयश आहे.
- किनवट तालुक्यात २०१४ मध्ये २६, २०१५-३२, २०१६-२९, २०१७-१२ तर ३ नोव्हेंबर २०१८ पर्यंत एकूण १२ आत्महत्या झाल्या आहेत़ अशाप्रकारे चार वर्षांतच १११ शेतकºयांनी मृत्यूला कवटाळले़
यावर्षी खरीप हंगामात सुरुवातीला समाधानकारक पाऊस झाला. त्यानंतर पावसाचा खंड व नंतर अतिवृष्टी यामुळे उतारा घटून तालुक्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे़ तर त्यात भर म्हणून आता रबी हंगाम घेऊ इच्छिणाºया व पाण्याची सोय उपलब्ध असलेल्या शेतकºयांच्या कृषिपंपाला वेळेवर वीजपुरवठा केला जात नाही़ तर रोहित्र जळाल्यानंतर वेळीच नवीन दिले जात नाही यामुळे पेरणी केलेले बियाणे जमिनीतच राहिले़ आजही विजेची समस्या कायम आहे. ट्रान्सफॉर्मर जळाले तर आॅईल नाही़ ही समस्या महावितरण शेतकºयांना सांगून अडवणूक करते, अशा परिस्थितीत चिंताक्रांत शेतकरी आत्महत्येला कवटाळून जीवन संपवतात. हे चित्र एका वर्षाचे नसून दरवर्षीचे आहे. विदर्भाच्या सीमेवर यवतमाळ जिल्ह्याला लागून असलेल्या किनवट तालुक्याला विदर्भ पॅकेजच्या धर्तीवर शासनाने पॅकेज जाहीर करून शेतकरी आत्महत्या थांबवाव्यात, अशी मागणी आहे. २००६ ते ३ नोव्हेंबर २०१८ या कालावधीत म्हणजे तेरा वर्षांत एकूण २१८ शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत, असे शेतकरी आत्महत्या प्रकरणाचा गोषवारावरून स्पष्ट होत आहे.