कंधार : पूर्व प्राथमिक शिक्षण, पोषण आहार, आरोग्य, लसीकरण आदींतून सशक्त, निकोप पिढी निर्माण करण्यासाठीचा पाया भक्कमपणे अंगणवाडीत घातला जातो़ अशा अंगणवाडीची मोठी परवड चालू आहे. ११३ अंगणवाड्यांना स्वतंत्र इमारत नसल्याने चिमुकल्यांची मोठी परवड होत आहे, त्यांची व्यवस्था इतरत्र सोयीनुसार केली जात असल्याचे समोर आले आहे़
शून्य ते सहा वयोगटातील बालकांना सक्षम, सशक्त, संस्कारक्षम, निरोगी करून देश बलवान करण्यासाठी अंगणवाडी केंद्र उपयुक्त ठरते़ त्यासाठी शासन अंगणवाडींना अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्नशील आहे़ परंतु अपेक्षित सोयी-सुविधा मिळत नसल्याची सातत्याने ओरड चालू असते़ त्यात पायाभूत सुविधेचा प्रश्न सतत चर्चेत असतो़ कारणही तसेच आहे़ स्वच्छ पाणी, स्वच्छतागृह, इमारती, योग्य पोषण आहार आदी विषय सातत्याने उपस्थित केले जातात़ त्यातील इमारतीचा प्रश्न ऐरणीवर असतो़ काही जागी तर आभाळाचे छत असल्याचे विदारक चित्र आहे़
तालुक्यातील एकूण अंगणवाडींची संख्या ३२० असून त्यात मिनी अंगणवाडींची संख्या ८० आहे़ भाड्याच्या जागेत २८ अंगणवाड्या भरतात़ जि़प़ शाळेत ३८ अंगणवाडींची सोय करण्यात आली आहे़ समाज मंदिरात ७ अंगणवाड्या, मंदिरात १, ग्रामपंचायतीत १४ अंगणवाड्या भरविल्या जातात़ परंतु काही अंगणवाडीतील बालकांची इमारती अभावी घूसमट चालू असल्याचे समोर आले आहे़ अशांची सोय कधी होणार हा खरा प्रश्न आहे़ संस्कारक्षम पिढींना सक्षम करण्यासाठी या सुविधा मिळणे गरजेचे आहे़
व्हरांड्यात १२ अंगणवाड्या भरतात, असे समोर आले आहे़ त्यात वहाद, पळसवाडी, चिखली मिनी, रुईतांडा, सावरगाव (नि़), वरवंट, पानभोसी, गुलाबवाडी तांडा, धर्मापुरी, मानसपुरी, बारूळ मिनी, काटकळंबा या अंगणवाड्यांचा समावेश आहे़ झाडाखाली दोन अंगणवाड्या भरतात़ त्यात रेखातांडा, सुजानवाडी या अंगणवाडीतील बालकांचा समावेशा आहे़ त्यात चक्क चार अंगणवाडीतील बालकांना ना भाड्याची इमारत, ना जि़प़ शाळा, ना समाजमंदिर, ना ग्रामपंचायत, ना व्हरांडा अशी स्थिती आहे़ तीन अंगणवाड्या उघड्यावर भरतात़ त्यात आलेगाव मिनी, पेठवडज, नावंद्याचीवाडी येथील अंगणवाडीचा समावेश असून लाभार्थी बालकांची एकूण संख्या ७० पेक्षा अधिक आहे़
इमारतीविना असलेल्या अंगणवाडींची संख्या मोठी आहे़ परंतु अवघ्या पाच अंगणवाडींचे बांधकाम मनरेगा अंतर्गत करण्याचा प्रस्ताव असल्याचे समजते़ त्यात चिखलभोसी येथील २, शिराढोण २, वंजारवाडी येथील १ अंगणवाडीचा समावेश असलयाचे समजते़ इतर अंगणवाडी इमारती स्वतंत्रणे कधी होणार व बांधकाम कधी होणार हा खरा प्रश्न आहे़