- रामकृष्ण मोरेदेगाव ( नांदेड): नांदेड-हैदराबाद महामार्गावर कार चालकाच्या डोक्याला बंदूक लावत दुचाकीवरील सहा जणांनी १२ लाख रुपयांची रोकड लुटल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली. चोरटे नायगावच्या दिशेने पसार झाले. या प्रकरणी कुंटूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.
नांदेड येथील खाद्यतेल पुरवठा करणारे व्यापारी रत्नाकर पारसेवार यांनी मुनीम युवराज निवळे व ड्रायवर अंकुश खोसडे यांना नायगाव येथे वसुलीसाठी पाठवले. १२ लाख रुपयांची रोकड जमा करून दोघेही कारमधून (MH 26 BX 3849 ) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास नांदेडकडे निघाले. अचानक तहसील फाट्याच्या समोर दोन दुचाकिने कार अडवली. त्यावरील सहा जणांनी उतरून गाडीस कट मारल्याचे सांगत वाद घटला. अचानक कारच्या काचा फोडल्या आणि चालकाच्या डोक्याला बंदुक लावली. इतरांनी मुनिमाकडून १२ लाखांची रोकड असलेली बॅग घेतली. त्यानंतर सर्वजण दुचाकीवरून नायगावकडे गेले. या धाडसी दरोड्यामुळे नायगाव परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच नायगाव व कुंटूर पोलिसांनी नाकाबंदी केली. मात्र, चोरटे हाती लागले नाहीत.