महापालिकेने हा प्रस्ताव ८ ऑगस्ट रोजी विभागीय आयुक्तांकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. त्यातील काही त्रुटी पाहता पुन्हा माहिती विभागीय आयुक्त कार्यालयाकडून मागविण्यात आली. ही माहितीही पुरविण्यात आली असून, आता लवकरच याप्रस्तावाच्या अनुषंगाने विभागीय आयुक्त बैठक घेऊन प्रस्तावाला मंजुरी देतील, अशी अपेक्षा आहे. ही प्रक्रिया पूर्ण होण्यास ८ ते १० दिवस लागतील, असेही मनपा बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता गिरीश कदम यांनी सांगितले.
चौकट-
पाणीपुरवठा योजनेचेही बळकटीकरण होणार
शहरात सध्या दोन दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. मागील काही कालावधीत हा पाणीपुरवठा चार ते पाच दिवसाआड होत होता. ‘धरण उशाला आणि कोरड घशाला’ अशी अवस्था नांदेडकरांची झाली होती. मात्र यासाठी पाणीपुरवठा विभागाचे कमकुवत झालेली यंत्रणा कारणीभूत ठरली आहे. जवळपास २० ते २५ वर्षांपूर्वीची यंत्रसामग्री आता काम करत नसल्याने ही परिस्थिती उद्भवली होती. मात्र त्याकडे लक्ष घातले असून, २० कोटी रुपये विशेष अनुदान महापालिकेला पाणीपुरवठा योजनेच्या बळकटीकरणासाठी प्राप्त झाले आहे. ही कामेही लवकरच हाती घेतली जाणार आहेत. त्यामुळे शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा करणे शक्य होणार आहे.