गेल्या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने, रेती घाटाचे लिलाव झाले नव्हते. त्यामुळे बांधकामे खोळंबली होती. सरकारी बांधकामे, घरकूल अशा अनेक कामांचा समावेश होता. बिलोली महसूल विभागाच्या अंतर्गत हुनगुंदा येथे एका खासगी रेती घाटाला शासनाने परवानगी दिली होती. त्यामुळे गेल्या चार-पाच दिवसांपासून कुंडलवाडी व परिसरात गरजूंना रेती टाकण्यासाठी ट्रॅक्टरने रेती वाहतूक चालू होती. आज बिलोली महसूल विभागाने अचानक रेती वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यासाठी आपल्या कर्मचाऱ्यांचा फौजफाटा घेऊन धडक मारली. यात चौकशीसाठी १३ ट्रॅक्टर ताब्यात घेतले असून, यात सर्व ट्रॅक्टर चालकांकडे रॉयल्टीच्या पावत्या होत्या, पण वाहन परवानगी, वे बिआची तपासणी करणे अशा अधिक तपासण्या व चौकशीसाठी ताब्यात घेतले.
यात या वाहनांच्या अधिक चौकशीसाठी तहसीलदारांनी ताब्यात घेतल्याचे सांगत, या चौकशीअंती काही नियमांचे उल्लंघन केलेले आढळल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले. प्रभारी उपविभागीय अधिकारी तथा तहसीलदार कैलासचंद्र वाघमारे व नायब तहसीलदार रघुनाथसिंह चौहान यांच्या मार्गदर्शनाखाली, महसूल व पोलीस प्रशासन, मंडळ अधिकारी तोटावार, मुळेकर, पेशकार कोकाटे, तलाठी बिराजदार, मेहत्रे, चमकुरे, आरू, सोनुले, राजकुंडल, लिपिक हजारे, झपलंकर आदी जण या पथकात होते.