- अविनाश पाईकराव नांदेड : शहरातील सहा पोलिस ठाण्यांच्या अंतर्गत बुधवारी रात्री कोंबिंग ऑपरेशन राबवून पोलिसांनी संशयित असलेल्या १३३ जणांची अचानक झडती घेतली. पोलिसांच्या या मोहिमेमुळे संशयित आरोपींमध्ये खळबळ उडाली आहे. गुरुवारी पहाटे ५ वाजेपर्यंत ही मोहीम राबविण्यात आली.
पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या सूचनेवरुन अपर पोलिस अधीक्षक अबिनाशकुमार, उप विभागीय पोलिस अधिकारी सुरज गुरव, सुशिलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनाखाली कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात आले. १६ ऑगस्ट रोजी रात्री शहरातील मुख्य चौकात नाकाबंदी करण्यात आली. या दरम्यान १३३ आरोपींची चौकशी केली. त्यापैकी ३४ आरोपींना पोलिस ठाण्यात नेवून गुन्हेगारीच्या अनुषंगाने त्यांची सखोल चौकशी केली.
प्राणघातक हल्ला, सशस्त्र गुन्हे, अवैध वाळू चोरी, भारतीय हत्यार कायद्याच्या कलमान्वय गुन्हे दाखल असलेल्या आरोपींचा यात समावेश होता. याच मोहिमेदरम्यान चोरीच्या प्रकरणातील एक आरोपी देखील पकडला. तसेच जामीनपात्र व अजामीनपात्र असे ९ वॉरंट तामील करण्यात आले. १९ जणांना संमन्स देण्यात आले. या मोहिमेत शहरातील सर्व पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, गुन्हे शोध पथकाचे अंमलदार, आरसीपी, क्युआरटीचे अंमलदार सहभागी झाले होते.