भोकर : तालुक्यातील १४ ग्राम- पंचायतींना स्वतंत्र कार्यालयासाठी इमारतीची आवश्यकता असून कार्यालयच नसल्याने गावचा कारभार उघड््यावर किंवा शाळेच्या वर्गखोलीत, समाजमंदिरात घेण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.
ग्रामपंचायतींच्या माध्यमातून गावचा विकास व्हावा, ती समृद्ध व्हावीत यासाठी शासनाने ग्रामपंचायतीला विशेष अधिकार दिले आहेत. ग्रामस्थांना गावातच विविध सुविधा उपलब्ध करून अद्ययावत नोंदी मिळण्यासाठी ग्रामपंचायत सुसज्ज व अत्याधुनिक संगणकयुक्त आॅनलाइन करण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र ग्रामस्तरावरील सचिवालय असलेल्या तालुक्यातील १४ ग्राम- पंचायतीच्या इमारती जुन्या व मोडकळीस आल्याने निरुपयोगी झाल्या आहेत. यात दिवशी बु, कामनगाव, जाकापूर, गारगोटवाडी, खडकी, धावरी खु, हाडोळी, आमठाणा, मोघाळी, नागापूर, डौर, समदरवाडी, बेंद्री आणि पाळज या १४ गावच्या ग्रामपंचायतींचे कार्यालयीन दैनंदिन कामकाज अपुऱ्या जागेत, शाळेच्या वर्गखोलीत, अंगणवाडीत, समाजमंदिरात किंवा सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या घरी अथवा खोलीवर चालते.
याशिवाय सदरील ग्रामपंचायतीअंतर्गत होणाऱ्या ग्रामसभा, चर्चा, बैठका यासाठी शाळेचेच प्रांगण, समाजमंदिर किंवा गावातील मंदिर परिसर याचा वापर होतो. एवढेच नाहीतर अनेक गावांत ग्रामसेवकांना कार्यालयीन कामासाठी बसायलाही जागा नसल्याने ते शासकीय दस्तावेज दुचाकीवर सोबत आणून कामे उरकतात. या सर्व गावांमध्ये ग्रामपंचायतीची जागा उपलब्ध आहे.मात्र इमारत नसल्यामुळे संबंधित गावप्रमुख, ग्रामसेवक यांनी वेळोवेळी जिल्हा परिषदेकडे ग्रामपंचायत कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत बांधकाम करण्यात यावे, असे लेखी कळविले आहे. तरीही इमारत मिळालेली नाही. तालुक्यातील १४ ग्रामपंचायत कार्यालयाला इमारतीची आवश्यकता असल्याचे वेळोवेळी माहिती देवून जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा केला आहे. परंतु, अद्यापपर्यंत काही सूचना मिळाल्या नाहीत. - जी. एल. रामोड, गटविकास अधिकारी भोकर.