नांदेड : राज्य उत्पादन शुल्क विभागाने फेब्रुवारी महिन्यात अवैध दारुविक्री, वाहतूक प्रकरणात तब्बल १४२ गुन्हे नोंदविले आहेत़ या गुन्ह्यांमध्ये १६ लाख ३९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे़ गतवर्षी फेब्रुवारीमध्ये ३ लाख ३१ हजारांचा मुद्देमाल जप्त केला होता़
राज्य उत्पादन शुल्क विभागाने फेब्रुवारी महिन्यात एकूण १४२ गुन्हे नोंदविले़ वारस गुन्हे १०७ आहेत़ या प्रकरणात १०५ आरोपींना अवैधरित्या दारुची वाहतूक केल्याप्रकरणात अटक करण्यात आली आहे़ दारु वाहतूक करणार्या १३ दुचाकी आणि २ कार जप्त करण्यात आल्या असून या सर्व गुन्ह्यांमध्ये १६ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे़ तर जानेवारी महिन्यात एकूण १३२ गुन्हे नोंदविण्यात आले होते़ यामध्ये १०२ आरोपींना अटक करुन १० हजार ८३३ लिटर ताडी, ४१३ लिटर देशी, ४०० लिटर विदेशी दारु आणि ६० लिअर बिअर जप्त करण्यात आली होती़ दारु वाहतुकीसाठी वापरलेल्या १२ दुचाकी आणि एका चारचाकी वाहनावरही कारवाई करण्यात आली़ तर ८ लाख ५७ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता़ जानेवारी २०१७ मध्ये फक्त दीड लाखांचा मुद्देमाल जप्त करण्याची कारवाई करण्यात आली होती. जिल्ह्यात अवैधरितीने होणारी दारुची वाहतूक रोखण्यासाठी पथके स्थापन करण्यात आली असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक नीलेश सांगडे यांनी दिली़