राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत ० ते १८ वयोगटातील बालकांची आरोग्य पथकामार्फत तपासणी केली जाते. या तपासणीतून गंभीर आजार असल्यास अथवा कुण्या बालकांमध्ये व्यंग असल्यास त्याच्यावर मोफत उपचार व शस्त्रक्रीया केल्या जातात. या उपक्रमांतर्गत नांदेड येथे तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
शिबिरात कान, नाक, घसा तज्ज्ञ डॉ. सुधीर कदम व त्यांच्या टीमकडून तपासणी करून त्यामधून ३० बालकांची बेरा तपासणी केली असता १५ बालकांना कॉकलेअर इम्प्लांट शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता असल्याचे निष्पण झाले. या १५ बालकांवर शस्त्रक्रिया करण्यापूर्वी विविध चाचण्या मोफत करण्यात आल्या. या १५ बालकांमध्ये नांदेडमधील २, नायगावमधील ४, लोहा २, कंधार १, किनवट २, भोकर १, हिमायतनगर २, तर उमरी तालुक्यातील एका बालकाचा समावेश आहे. शस्त्रक्रिया करण्यासाठी लागणाऱ्या ७८ लक्ष रुपये खर्चाची तरतुद आवश्यक होती. जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाकडे अनुदान उपलब्ध नव्हते. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर घुगे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नीळकंठ भोसीकर यांनी आरोग्य कुटुंब कल्याण कार्यालय पुणे येथून मंजूर करून घेतले. या शस्त्रक्रियांसाठी सामंजस्य करार करून सांगली येथे या पंधराही बालकांवर शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. या शस्त्रक्रियेमुळे त्या बालकांचे बहिरेपण दूर झाले आहे. राष्ट्रीय बाल स्वाथ्य कार्यक्रमाचे जिल्हा समन्वयक अनिल कांबळे यांनीही यासाठी पुढाकार घेतला.