विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात एमआरआय मशीन नव्हती. विविध आजारांच्या निदानासाठी रुग्णांना खासगी रुग्णालयात अधिकचे पैसे खर्च करावे लागत होते. उपचाराची दिशा ठरवताना एमआरआय चाचण्या मह्त्त्वाच्या असल्याने रुग्णांना मेंदूचे विकार, स्नायू, मणक्याचे विकार, छाती, हृदय, रक्तवाहिन्यांच्या तपासण्यासाठी खासगी रुग्णालयात जावे लागत होते. खासगीतील निदान गरीब व सर्वसामान्यांना परवडणारे नव्हते.
डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधा असाव्यात, यासाठी पालकमंत्री चव्हाण यांनी प्रारंभीपासूनच प्रयत्न केला होता. या प्रयत्नातून आवश्यक असलेले विविध उपकरणे खरेदी केली असली तरी अद्याप एमआरआय मशीन नसल्याने या मशीनच्या खरेदीस मान्यता द्यावी, अशी मागणी चव्हाण यांनी सातत्याने शासनाकडे केली होती. या पाठपुराव्यास यश आले. वैद्यकीय शिक्षण विभागाने एमआरआय मशीन खरेदीस मान्यता दिली आहे. जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत २०२१-२२ या वित्तीय वर्षात मंजूर अनुदानातून १९ कोटी रुपये एमआरआय मशीन खरेदी करण्यासाठी मंजूर करण्यात आले आहेत. एमआरआय मशीन खरेदीसाठी मान्यता दिल्याने या मशीनच्या खरेदीची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात एमआरआय मशीनची सुविधा उपलब्ध झाल्यास सर्वसामान्य रुग्णांना विविध आजारांच्या निदानासाठी खासगी रुग्णालयात जावे लागणार नाही.