शेतकऱ्यांना शेतीकामे करताना तिन्ही ऋतूंत विविध समस्यांचा सामना करावा लागतो. शेतीत राबत असताना किंवा शेतीसंबंधी कामे करताना शेतकऱ्यांचे अपघाताने मृत्यू होण्याचे प्रमाण वाढत आहे. अशा घटनांनी शेतकरी कुटुंबावर मोठे संकट ओढवते. कुटुंबीयांना मोठ्या आर्थिक संकटावर मात करण्यासाठी संघर्ष करावा लागतो. अपघातग्रस्त कुटुंबाला दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने शेतकरी अपघात विमा योजना राबविण्यास सुरुवात केली. राज्यातील सर्व खातेदार शेतकऱ्यांचा विमा हप्ता राज्य शासन भरत असते. तालुक्यातील आलेगाव, संगमवाडी, घागरदरा, पेठवडज, गऊळ, पानभोसी, शिराढोण, संगुचीवाडी, मंगलसांगवी, गंगनबीड, तेलूर, मरशिवणी, उदातांडा, औराळ, मोहिजा, बिंडा, भेंडेवाडी, बाचोटी आदी गावांतील प्रत्येकी एका लाभार्थ्याला मंजुरीची प्रतीक्षा लागली आहे. जानेवारी २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत घडलेल्या घटनेचे प्रस्ताव असल्याचे सांगण्यात आले.
९२पैकी ४५ शेतकरी कुटुंबाला लाभ
तालुक्यातून आतापर्यंत ७५ प्रस्ताव योजनेसाठी दाखल करण्यात आले होते. त्यातील ४५ प्रस्ताव मंजूर झाले. २०२०मधील २१ प्राप्त प्रस्तावांपैकी फक्त २ प्रस्तावांना मंजुरी मिळाली आहे. १२ प्रस्ताव संबंधित कंपनीस्तरावर मंजुरीसाठी प्रलंबित आहेत. ६ प्रस्ताव त्रुटीत, तर १ प्रस्ताव मार्गदर्शक सूचनेप्रमाणे निकषात नसल्याने पात्र ठरत नाही, असे समजते. मागील वर्षी योजनेची व्याप्ती वाढविण्यात आली आहे. वहितीधारक खातेदार शेतकरी व शेतकऱ्यांच्या कुटुंंबातील वहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेला कोणताही एक सदस्य (आई - वडील, पती - पत्नी, मुलगा व अविवाहित मुलगी) योजनेत समाविष्ट करण्यात आला आहे.
चौकट - शेतकऱ्यांचा दुर्दैवाने अपघात झाल्यास तालुका कृषी कार्यालयात घटनेपासून ४५ दिवसांत विहित नमुन्यात प्रस्ताव दाखल करावा. योजनेची व्याप्ती २०१९-२०२० पासून शासनाने वाढविली आहे. खातेदार असलेल्या शेतकऱ्यासह कुटुंबातील एका सदस्याचा समावेश योजनेत केला आहे. त्यामुळे अपघाती मृत्यू किंवा दोन अवयव अपघातात निकामी झाले तर २ लाख रुपये आणि एक अवयव निकामी झाल्यास १ लाख रुपयांची नुकसानभरपाई मिळते.
- रमेश देशमुख (तालुका कृषी अधिकारी, कंधार.)