नांदेड शहराचा अलीकडल्या काळात मोठ्या प्रमाणात विस्तार झाला आहे. शहराच्या विकास कामांना निधी उपलब्ध व्हावा, यासाठी महापालिकेच्या वतीने डिपीडीसीमधून शहरातील दलितवस्त्यांच्या विकासासाठी २० कोटी रुपयांची मागणी केली होती. त्यानुसार डिपीडीसीच्या २०२०-२१ च्या आराखड्यामध्ये या निधीची तरतुद करुन त्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे.
सदरील निधी संदर्भात जिल्हा प्रशासनाने २३ मार्च रोजी आदेश निर्गमीत केले असून या आदेशानुसार नांदेड शहरासाठी २० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या निधी अंतर्गत नांदेड शहरातील अनेक नगरांमध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामे हाती घेण्यात येणार आहेत. यामध्ये रस्ते मजबुतीकरण, नाली बांधकाम, ड्रेनेज लाईनची निर्मिती, समाज मंदिरांचे बांधकाम, स्मशानभुमीचे सुशोभिकरण व बांधकाम आदी कामे हाती घेण्यात येणार आहे.
या निधी अंतर्गत शहरातील विविध १२ प्रभागांमध्ये विकास कामे हाती घेण्यात आले आहे. पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी अलीकडल्या काळात शहर व जिल्ह्याच्या विकासासाठी राज्य शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणला आहे. त्यातच आता त्यांच्याच अखत्यारित असलेल्या डीपीडीसीमधून त्यांनी २० कोटी रुपयांच्या कामांना मंजूरी दिली आहे. त्यामुळे शहराच्या विकासास गती मिळणार आहे.