लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत यंदा २० टक्के जलसाठा आॅगस्टअखेर उपलब्ध झाला आहे. गतवर्षी आॅगस्ट अखेर जिल्ह्यात २७६ दलघमी अर्थात ३७ टक्के जलसाठा उपलब्ध होता. यावर्षी आॅगस्टअखेर ४२५ दलघमी जलसाठा उपलब्ध झाला असून या साठ्याची टक्केवारी ५७ टक्के इतकी आहे.जिल्ह्यात असलेल्या दोन मोठ्या प्रकल्पांपैकी विष्णूपुरी प्रकल्पात १०० टक्के जलसाठा उपलब्ध झाला आहे. पण त्याचवेळी दुसरा मोठा प्रकल्प असलेल्या मानार प्रकल्पात केवळ ३८ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. मानार प्रकल्पाची क्षमता १४६.९२ दलघमी इतकी आहे.या प्रकल्पात आजघडीला केवळ ५२.९३ दलघमी साठा उपलब्ध आहे. जिल्ह्यात असलेल्या मध्यम प्रकल्पात ६३ टक्के जलसाठा उपलब्ध झाला असून ५०.१६ दलघमी पाणी मध्यम प्रकल्पात जमा झाले आहे.जिल्ह्यात असलेल्या उच्चपातळी बंधाऱ्यामध्ये ९१.८२ दलघमी असून या पाण्याची टक्केवारी ५० टक्के इतकी आहे. जिल्ह्यात एकूण ८८ लघु प्रकल्प आहेत. या प्रकल्पांची जलक्षमता २१७ दलघमी इतकी असताना १३४ दलघमी जलसाठा आजघडीला लघू प्रकल्पामध्ये उपलब्ध झाला आहे. जिल्ह्यात लघू, मध्यम, मोठे आदी १०७ प्रकल्प आहेत.या प्रकल्पात ८२० दलघमी जलसाठा होऊ शकतो. त्यात आजघडीला ४२५.४७ दलघमी साठा उपलब्ध आहे. एकूण साठा ५७.३६ इतका आहे. नांदेड जिल्ह्यात असलेल्या कोल्हापुरी बंधाºयात मात्र एक थेंबही पाणी यंदाही साठले नाही. जिल्ह्यात ४ कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे आहेत. या बंधाºयांची क्षमता ७.४४ दलघमी इतकी आहे. प्रत्यक्षात मात्र एक थेंबही पाणी साठवता आले नाही. कोल्हापुरी बंधाºयाची उपयुक्तता मोठ्या प्रमाणात असली तरी देखभाल व दुरुस्तीअभावी मागील काही वर्षांपासून कोल्हापुरी बंधारे निकामी झाले आहेत.नांदेड पाटबंधारे मंडळात १२५१ दलघमी जलसाठानांदेड पाटबंधारे मंडळांतर्गत नांदेडसह हिंगोली, यवतमाळ आणि परभणी जिल्ह्यांतील प्रकल्पांचा समावेश होतो. नांदेड पाटबंधारे मंडळांतर्गत १४५ प्रकल्प असून या प्रकल्पांची जलक्षमता ३३९१ दलघमी इतकी आहे. आजघडीला नांदेड पाटबंधारे मंडळांतर्गत १२५१ दलघमी जलसाठा उपलब्ध असून ४६.४४ टक्के इतकी त्याची टक्केवारी होत आहे. यवतमाळ जिल्ह्यातील इसापूर प्रकल्पाचा नांदेड जिल्ह्याचा मोठ्या प्रमाणात लाभ होतो. गतवर्षी आॅगस्टअखेर इसापूर प्रकल्पात केवळ ६.९४ टक्के साठा होता. यावर्षी मात्र इसापूरच्या जलसाठ्यात लक्षणीय वाढ झाली असून ६७ टक्के अर्थात ४४८ दलघमी पाणी उपलब्ध झाले आहे. यामुळे नांदेड जिल्ह्यातील शेतकरी सुखावला आहे.
नांदेड जिल्ह्यात गतवर्षीपेक्षा २० टक्के जादा जलसाठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2018 12:43 AM