लोकमत न्यूज नेटवर्क नांदेड/औरंगाबाद : राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) मराठवाड्यातील औरंगाबाद, नांदेड, परभणी, जालना, बीड या जिल्ह्यांमधून पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया संघटनेशी संबंधित अकराजणांना ताब्यात घेतले आहे. यात औरंगाबाद आणि परभणीतून प्रत्येकी चार, तर नांदेड, जालना आणि बीड येथून प्रत्येकी एकाला ताब्यात घेतले.
नांदेडच्या देगलूर नाका भागातून मोहम्मद मेराज अन्सारी या पीएफआयच्या सदस्याला ताब्यात घेतले. अन्सारी याचे भागात किराणा आणि इतर वस्तू विक्रीचे दुकान आहे. परभणीतून अब्दुल सलाम (३४), मोहम्मद निसार (४१), मोहम्मद जाविद (३५), अब्दुल करीम (३५) या चौघांना एनआयएच्या पथकाने ताब्यात घेतले. या पाचही आरोपींना न्यायालयाने आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आबेद अली हा सहावा आरोपी फरार आहे. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या औरंगाबाद शाखेचा माजी जिल्हाध्यक्ष इरफान मिल्ली, परवेज खान, फैसल सय्यद खलील आणि नासीर नदवी यांना एटीएस आणि एनआयएच्या पथकाने जिन्सी भागातून अटक केली. त्याशिवाय जालना येथील ट्रान्स्पोर्टचा व्यावसायिक अब्दुल हद्दी अब्दुल रौफ मोमीन (३२, रा. रहमान गंज) यासही जळगाव येथून अटक केली. मोमीन या संघटनेचा खजीनदार आहे. बीडमधून पीएफआय संघटनेच्या माजी जिल्हाध्यक्ष वसीम अजीज शेख (३०, रा. जुना बाजार, बीड) यास ताब्यात घेतले. पीएफआय संघटनेच्या मूळ पदाधिकाऱ्यांपैकी एक म्हणून वसीम शेखची ओळख आहे.नाशिक : मालेगावमधील पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या पदाधिकाऱ्यांच्या घरांवरही छापे टाकण्यात आले. संघटनेचे नाशिक जिल्हाध्यक्ष मौलाना सैफूर रहमान (रा. गल्ली क्रमांक दोन, हुडको कॉलनी) यांना ताब्यात घेतले.
मुंबई, पुणे, कोल्हापुरात कारवाई; नऊजण ताब्यातमुंबई : पीएफआयवर केलेल्या कारवाईत एटीएसने मुंबईतून ५ जणांना अटक केली. यामध्ये कुर्ला, मालाड, कांदिवलीसह विविध भागांतील सदस्यांचा समावेश आहे. पाचही जणांना २६ सप्टेंबरपर्यंत एटीएस कोठडी सुनावली आहे.नवी मुंबई : नेरूळमधील सेक्टर २३ येथील पीएफआयच्या कार्यालयावर छापा टाकला. सुमारे आठ तासांच्या झाडाझडती नंतर पनवेलच्या बंदर रोड येथून असीम अधिकारी याला ताब्यात घेतले आहे. नेरूळच्या कार्यालयाची जबाबदारी सांभाळणाऱ्या आसिफ शेख यांना पहाटे चारच्या सुमारास घरातून ताब्यात घेतले.भिवंडी : शहरातील बंगालपुरा येथील मोईनुद्दीन मोमीन या युवकाला ठाणे येथील दहशतवाद विरोधी पथकाने ताब्यात घेतले.कोल्हापूर : सिरत मोहल्ला परिसरातील एका संशयितास मध्यरात्री झोपेतूनच ताब्यात घेतले. मौला नबीसाब मुल्ला (वय ३८) असे त्याचे नाव आहे. पुणे : दहशतवाद विरोधी पथकाने पहाटे कोंढवा येथून पीएफआयच्या दोघांना अटक केली. अब्दुल कय्युम शेख आणि रजी अहम खान (दोघेही रा. कोंढवा) अशी त्यांची नावे आहेत.