या प्रकरणांचा आढावा घेतला असता यातील बहुतांश प्रकरणेही माहेराहून या ना त्या कारणासाठी पैसे आण म्हणून मागणी केल्यानंतर झालेल्या वादातून ही प्रकरणे दाखल झाली आहेत. त्याचवेळी सासू, सुनेचा वाद, मोबाईलवरून संवाद साधण्याचे कारण यातूनही वादाचे प्रकार घडले आहे.
३० प्रकरणे निकाली
जिल्ह्यात कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम अंतर्गत ३० प्रकरणे १ एप्रिल २०२० ते २८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत निकाली निघाले आहेत. त्यामध्ये नांदेड तालुक्यातील ७, मुदखेड ५, भोकर ५, कंधार १, लोहा १, नायगाव ३, देगलूर ४, बिलोली १ आणि हदगाव तालुक्यातील ३ प्रकरणांचा समावेश आहे. यातील अनेक प्रकरणेही सामोपचारानेही सोडवण्यात आली आहेत.
चौकट---------
घर चालवण्यासाठीही माहेरच्यांची मदत
नोकरी तसेच रोजगार गमावल्यानंतर अनेक कुटुंबात आर्थिक संकट उद्भवले होते. कोरोना काळात इतर कामेही उपलब्ध होत नव्हती. त्यामुळे विवाहितांना माहेराहून पैसे आणण्याची मागणी मोठ्या प्रमाणात करण्यात आली होती. यात नवविवाहितांकडे आर्थिक मागणीचे प्रमाण सर्वाधिक होते. त्याचवेळी लॉकडाऊन काळात घरामध्ये इतर सदस्यांशी पटत नसल्यानेही कौटुंबिक हिंसाचाराची प्रकरणे दाखल झाली आहेत.