नांदेड: नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात औषध पुरवठा, नर्सेस व डॉक्टरांचा स्टाफ अत्यंत कमी आहे. त्यामुळे रुग्णांची सुश्रुषा नीटनेटकी होत नाही. दुर्देवाने या समस्यांमुळेच मागील २४ तासांत २४ रुग्णांना जीव गमवावा लागल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी उघड झाला. गंभीर बाब म्हणजे मृतांमध्ये १२ नवजात बालकांचा समावेश आहे.
सदर घडलेल्या प्रकारानंतर चौकशी समिती आज नांदेडमध्ये येणार आहे. शासकीय रुग्णालयात २४ तासांत २४ रुग्णांचे मृत्यू झाल्याच्या प्रकरणाची शासनाने गंभीर दखल घेतली असून मंगळवारी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयातील डॉ. भारत चव्हाण, डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य आणि बालरोग तज्ज्ञ डॉ. जोशी या तिघांची चौकशी समिती नांदेडात येणार आहे.
जिल्हा नियोजन समितीकडून रुग्णालयासाठी ४ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यातील १ कोटी रुपयांत यंत्रसामग्री, १ कोटीची औषध खरेदी, १ कोटी शस्त्रक्रियेसाठी लागणारे साहित्य आणि उर्वरित १ कोटी ऑक्सिजन प्लँटसाठी ठेवण्यात आले आहेत; परंतु प्रस्तावाला अद्याप तांत्रिक मान्यता मिळाली नसल्याची माहिती समोर आली आहे. ‘हाफकिन’ने औषध खरेदी करून न दिल्याने गोरगरिबांचा मोठा आधार असलेल्या शासकीय रुग्णालयांना औषधांचा पुरवठाच करण्यात आलेला नाही. त्यामुळे राज्यभरातील रुग्णालयांमध्ये सध्या औषधांचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे.
दरम्यान, नांदेडमधील मृत्यूचे हे तांडव शासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे झाल्याचा गंभीर आरोप या भागातील स्थानिक आमदार व अभ्यागत मंडळाचे माजी अध्यक्ष आ. मोहन हंबर्डे यांनी केला आहे. सिटीस्कॅन यासारख्या करोडो रुपये खर्च करुन खरेदी केलेल्या अनेक मशिन केवळ शासनाने एएमसी अर्थात वार्षिक देखभाल निधी न दिल्यामुळे धूळ खात पडून आहेत. मागील दीड वर्षांपासून या महाविद्यालयास पूर्ण वेळ अधिष्ठाता दिला नाही. प्रभारी राज सुरु आहे. प्राध्यापकांच्या प्रतिनियुक्त्या आणि नर्सेसचा तुटवडा यामुळेच या रुग्णालयातील रुग्णसेवा ढासळल्याचा आरोप माजी अभ्यागत मंडळाने केला आहे.