लोहा ( नांदेड) : आज दुपारी तीन वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह तालुक्यात जोरदार पाऊस झाला. दरम्यान, तालुक्यातील धावरी येथे पोटाची खळगी भरण्यासाठी आलेल्या ऊसतोड कामगारांवर वीज पडून तिघांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला.
तालुक्यातील धावरी येथील शेतकरी किशन पवार यांच्या शेतामध्ये सकाळपासून उसतोडीचे काम सुरू होते. अचानक दुपारी तीन वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झाला. यावेळी माधव पिराजी डुबुकवाड (५२ रा.पानभोसी), पोचीराम शामराव गायकवाड ( ४८ रा. पेठ पिंपळगाव) , रूपाली मोतीराम गायकवाड(१७) आणि पूजा माधव डुबुकवाड हे उसतोडणी करत होते. अचानक पाऊस सुरु झाल्याने हे चौघे शेतातील लिंबाच्या झाडाखाली थांबले.मात्र, इथेच घात झाला, अचानक त्यांच्यावर वीज कोसळली. यात माधव डुबुकवाड, पोचीराम गायकवाड, रूपाली गायकवाड या तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर पूजा माधव डुबुकवाड ही तरुणी गंभीर जखमी झाली. सरपंच माणिक वाकडे, उपसरपंच अशोक गीते रूक्माजी पवार यांनी जखमी पूजास उपचारासाठी लोहा येथील शासकीय रुग्णाला दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर तिला अधिक उपचारासाठी नांदेड येथील शंकराव चव्हाण शासकीय रुग्णालयात रवाना करण्यात आले.
दरम्यान, माहिती मिळतात उपविभागीय अधिकारी शरद मंडलिक, तहसीलदार व्यंकटेश मुंडे , पोलीस निरीक्षक संतोष तांबे, नायब तहसीलदार अशोक मोकले, मंडळ अधिकारी भोसीकर, तलाठी पांडागळे आदींनी घटनास्थळी भेट दिली. मृतामधील दोघे परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातील आहेत.