मनपातील उपअभियंता संघरत्न सोनसळे हे कंत्राटी कर्मचारी आहे. त्यांना जाणीवपूर्वक सेवेत सामावून घेत नसल्याचा आरोप करीत त्यांना कायमस्वरूपी सामावून घ्यावे, असा ठराव बापुराव गजभारे यांनी ठेवला होता. या ठरावालाही मंजुरी देण्यात आली. घरकुल योजनेअंतर्गत लाभार्थींकडून जादा रक्कम वसूल केल्याचा आरोप गजभारे यांनी केला. यात मनपाने नियुक्त केलेल्या खासगी सल्लागाराच्या लोकांचाही सहभाग असल्याचे ते म्हणाले. याबाबत तातडीने कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.
चौकट--
अनुपस्थित अधिकाऱ्यांना १०० रुपये दंड
स्थायी समितीच्या सभेस विनापरवानगीने अनुपस्थित राहणाऱ्या अधिकाऱ्यांना १०० रुपये दंड लावण्याचा निर्णयही घेण्यात आला. कोणतीही परवानगी न घेता अधिकारी बैठकीस अनुपस्थित राहू कसे शकतात, असा प्रकार वारंवार होत असल्याने त्यावर आळा घालणे आवश्यक होते. त्यामुळे दंडात्मक कारवाई केल्याचे सभापती वीरेंद्रसिंघ गाडीवाले यांनी सांगितले.