नांदेड : जिल्हा नियोजन समितीच्या पुढाकारातून जिल्ह्यात जिल्हा कर्करोग व जनजागृती नियंत्रण प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पातंर्गत जिल्ह्यातील ८ तालुक्यांत १९ कर्करोग निदान शिबिरे घेण्यात आली. यावेळी ३० रुग्ण आढळले असून त्यांच्यावर विविध रुग्णांलयात उपचार सुरु करण्यात आले आहेत.जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या पुढाकाराने हा प्रकल्प जिल्ह्यात राबविण्यात येत असून या कार्यक्रमाची अंमलबजावणी जिल्हा परिषद आरोग्य विभाग आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांच्यामार्फत करण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून जिल्ह्यातील ८ तालुकाअंतर्गत १९ कर्करोग निदान शिबिरे घेण्यात आली. यामध्ये २९ प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गत २ लाख ३८ हजार १६६ घरांमध्ये आशा व आरोग्य कर्मचाऱ्यामार्फत सर्वेक्षण करण्यात आले. सर्वेक्षणानंतर घेतलेल्या निदान शिबिरामध्ये ७ हजार ७९४ रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली. त्यापैकी १ हजार ६०५ रुग्णांना नांदेड येथे पुढील तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले. तसेच ६५३ रुग्ण ज्यांना पुढील काही काळामध्ये कर्करोग होण्याची शक्यता आढळून आली, अशांवर प्रतिबंधात्मक औषधोपचार करण्यात येवून त्यांना आरोग्य शिक्षणही देण्यात आले़ सदर प्रकल्पातंर्गत जिल्ह्यातील १६ तालुक्यांमधून ६५ प्राथमिक आरोग्य केंद्र व १६ ग्रामीण रुग्णालय या कार्यक्षेत्रांमध्ये कर्करोग जनजागृती व नियंत्रणाचे काम करण्यात येत असून ४ लाख घरांमध्ये जनजागृती करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डोंगरे यांनी सांगितले.१२०० आशा वर्कर्सना कर्करोगाचे प्रशिक्षणया उपक्रमातंर्गत जिल्ह्यातील २५ लाख लोकसंख्येमध्ये कर्करोगाविषयी जनजागृती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी सुमारे १२०० आशा वर्कर्सना कर्करोगाविषयीचे प्रशिक्षण देण्यात आले असून, या प्रकल्पाच्या निष्कर्षामुळे राज्यात इतर ठिकाणीही कर्करोग नियंत्रण प्रकल्प राबविण्यास मदत मिळणार आहे. सर्वसाधारणपणे १ हजार कर्करोग संशयित व कर्करोग रुग्णांचे निदान व उपचार करण्यात येणार आहेत़
कर्करोग जनजागृती उपक्रम जिल्हाभरात राबविण्यात येत आहे. या उपक्रमात आशा वर्कर्स तसेच कर्करोग जनजागृती कार्यक्रम पथक अग्रभागी असून कर्करोगाचे लवकर निदान होत असल्याने उपचारासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. वेळेत उपचार मिळाल्यास कर्करोग पूर्णपणे बरा होऊ शकतो. या उपक्रमाच्या माध्यमातून कर्करोगामुळे होणारा मृत्यूदर कमी होऊ शकतो. येणाऱ्या काळात या उपक्रमाच्या माध्यमातून होत असलेल्या कर्करोगाच्या जनजागृतीमुळे नांदेड जिल्हा कर्करोग मुक्त होईल. - अरुण डोंगरे, जिल्हाधिकारी
- जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या नावीन्यपूर्ण कर्करोग जनजागृती व नियंत्रण कार्यक्रमामुळे कर्करोगाचे वेळेत निदान होत आहे. १९ शिबिरांमध्ये केलेल्या तपासणीत तोंडाच्या कर्करोगाचे २१, स्तनाच्या कर्करोगाचे ४, गर्भाशय पिशवीच्या मुखाच्या कर्करोगाचे ५ असे ३० रुग्ण आढळून आले असून, यातील २८ रुग्णांवर नांदेड येथील मोनार्क कर्करोग रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले आहेत.एका रुग्णावर औरंगाबाद येथील रुग्णालयात तर एकावर बार्शी येथील नर्गिस दत्त रुग्णालयात उपचार सुरु केल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.