नांदेड : शहरात आजघडीला अनेकजण दुचाकीवरुन जाताना मोबाईलचा सर्रासपणे वापर करतात. मोबाईलमध्ये बोलण्यात गुंग असल्यामुळे अशा दुचाकीस्वारांचे अनेकवेळा अपघात होतात. गेल्या वर्षभरात शहरात अशाप्रकारे ३० जणांनी आपला जीव गमावला आहे. तर अपघातात गंभीर जखमी झालेल्यांचे प्रमाणही अधिक असल्याचे दिसून येते.
ब्रेथ ॲनॉलायझरवरील धूळ हटेना
मद्यपी वाहनधारकांवर कारवाई करण्यासाठी शहर वाहतूक शाखेला ब्रेथ ॲनाॅलायझर देण्यात आले आहे. परंतु केवळ सण-उत्सव आणि नाकाबंदीच्या काळात या ब्रेथ ॲनाॅलायझरचा उपयोग केला जातो. इतरवेळी मात्र त्यावरील धूळही हटत नाही.
शहरात हेल्मेट सक्तीचा विसर पडला आहे. कुणीही वाहन चालविताना हेल्मेटचा वापर करीत नाही. काही वर्षांपूर्वी अशा वाहनधारकांवर कारवाईची माेहीम सुरु करण्यात आली होती; परंतु त्यावेळी नांदेडकरांनी त्याला प्रचंड विरोध केला. अपघाताला रस्त्यावरील खड्डेही कारणीभूत आहेत. खड्ड्यामुळे अनेकांचा जीव गेला आहे; परंतु खड्डे अद्यापही बुजले नाहीत.