नांदेड : कोरोनाच्या संकटामुळे गेल्या आठ महिन्यांपासून शाळा बंदच आहेत. परंतु विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून अनेक शाळांनी ऑनलाईन शिक्षण सुरु केले आहे. त्यात अनेक अडचणी असल्या तरी, प्रतिसाद चांगला मिळत आहे. परंतु यामध्ये बालकामगार शाळांतील विद्यार्थी मात्र स्मार्टफोन नसल्यामुळे वंचित राहत आहेत. या विद्यार्थ्यांनी गेल्या आठ महिन्यांत कोणतेही धडे गिरविले नाहीत. त्यामुळे मुख्य प्रवाहापासून ते दूर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
शहरातील हॉटेल, घरकाम, वीटभट्टी यासह इतर ठिकाणी बालकामगारांना कामावर ठेवू नये, असे आदेश आहेत. परंतु त्यानंतरही अनेक ठिकाणी चिमुकले अशा धोकादायक कामासाठी आहेत. त्यामुळे त्यांचे बालपण खुडल्या जाते. अशा मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाने बालकामगार शाळा सुरु केल्या आहेत. एप्रिल, मे आणि जून महिन्यात जिल्ह्यात त्यासाठी सर्वेक्षण करण्यात येते. ज्या ठिकाणी पन्नासहून अधिक बालकामगार सापडले, त्या ठिकाणी स्वतंत्रपणे बालकामगार शाळा सुरु करण्यात येते. २००४ पासून नांदेड शहरात अशा सहा बालकामगार शाळा सुरु आहेत. प्रत्येक शाळेत किमान ५्० विद्यार्थी याप्रमाणे जवळपास ३०० बालकामगार या ठिकाणी शिक्षण घेतात. कुटुंबासाेबत रहायचे अन् बालकामगार शाळेत धडे गिरवायचे, असा त्यांचा दिनक्रम होता. त्यासाठी शासनाकडूनही भरीव मदत करण्यात येते. परंतु कोरोनामुळे सर्वांवरच पाणी फेरले आहे.
गेल्या आठ महिन्यांपासून शाळा बंदच आहेत. त्यामुळे अनेक शाळांनी ऑनलाईन शिक्षणपद्धतीचा अंगीकार केला आहे. परंतु शहर व ग्रामीण भागातही घरात एकच स्मार्टफोन असणे, रेंज न मिळणे यासारख्या अडचणी आहेत. परंतु त्यानंतरही अनेकजण घरात बसूनच ऑनलाईन शिक्षण घेत आहेत. परंतु, याचा सर्वाधिक फटका हा बालकामगारांना बसला आहे. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने अनेकांकडे स्मार्ट फोन नाहीत. त्यामुळे तब्बल तीनशेहून अधिक बालकामगार मुलांनी गेल्या आठ महिन्यांत अक्षरही गिरविले नाही. त्यामुळे ही मुले शिक्षणाच्या मुख्य प्रवाहातून दूर जाण्याची भीती आहे.
जुने स्मार्टफोन देण्याचे आवाहनबालकामगार शाळांतील मुलांना शिक्षणासाठी स्मार्टफोन देण्याची गरज आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्याकडील जुने स्मार्टफोन दिल्यास ते बालकामगारांना देऊन त्यांना ऑनलाईन शिक्षण घेण्यास मदत होईल. नागरिकांनी परिवार प्रतिष्ठान, चिखलवाडी कॉर्नर या ठिकाणी हे स्मार्ट फोन आणून द्यावेत असे आवाहन करण्यात आले आहे.