नांदेड : आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन म्हणून राबविण्यात येणाऱ्या आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजनेला विलंबाने मिळत असलेल्या अनुदानामुळे खीळ बसली आहे. आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांचे मागील तीन वर्षांपासून प्रलंबित असलेले अनुदान जिल्हा परिषदेच्या पाठपुराव्यामुळे प्राप्त झाले असून तब्बल १९ लाख रूपयांचे वाटप ३८ जोडप्यांना करण्यात आले.
सामाजिक समतेचा संदेश, आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यास आर्थिक सहाय म्हणून समाजकल्याण विभागातर्फे आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजना राबविण्यात येते. या योजनेसाठी म्हणावे तसे प्रस्ताव प्राप्त होत नसल्याचे समोर आले आहे. मागील तीन वर्षांत केवळ ३८ जोडप्यांचे प्रस्ताव मंजूर होवून त्यांना मार्च २०२० मध्ये अनुदान वाटप करण्यात आले.
आर्थिक सहाय्य मिळत नसल्याने योजनेला खीळ२०१७, २०१८ व २०१९ या वर्षांतील प्रस्ताव अनुदानापासून वंचित होते. दोन वर्षे या योजनेसाठी असलेला निधी प्राप्त होत नव्हता. मात्र, जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाच्या वतीने पाठपुरावा केल्यानंतर २०२० मध्ये मागील तीन वर्षांच्या रखडलेल्या प्रस्तावांचे १९ लाख अनुदान प्राप्त झाले.
याेजनेचा लाभ कोणाला?योजनेत अनुसूचित जाती, जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती यापैकी एक व्यक्ती आणि दुसरा व्यक्ती सवर्ण धर्मातील असेल तर त्या विवाहास आंतरजातीय विवाह म्हणून संबोधण्यात येते. अनुसूचित जाती, जमाती यापैकी एका व्यक्तीने सवर्ण धर्मातील व्यक्तीशी विवाह केला तर ते अनुदानास पात्र ठरतात. या योजनेअंतर्गत ५० हजारांचे आर्थिक सहाय देण्यात येते.