नांदेड : जलयुक्त शिवारच्या कामांना जिल्ह्यात गती मिळेनाशी झाली असून ५ हजार ४२४ पैकी आजघडीला केवळ ३९२ कामे पूर्ण झाली आहेत़ या कामांवर २ कोटी १९ लाख रुपये खर्च झाला आहे. जिल्ह्यात २०१७-१८ मध्ये १८३ गावांमध्ये जलयुक्तची कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत.
या प्रस्तावित कामांना विभागीय आयुक्तांची मान्यताही मिळाली आहे़ प्रस्तावित कामांमध्ये ५ हजार ४२४ कामांचा समावेश आहे़ यासाठी ८३ कोटी ४६ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे़ कामाची गती पाहता जिल्ह्यात जलयुक्तचा वेग वाढवणे आवश्यक आहे़ ५ हजार ४२४ कामांपैकी जिल्ह्यात कृषी विभागाची सर्वाधिक ३ हजार १७६ कामे आहेत़ या कामावर ४३ कोटी ८९ लाख रुपये खर्च प्रस्तावित आहेत. आतापर्यंत १८ कोटी ८० लाख रुपये खर्च झाला आहे़ ग्रामपंचायतीमध्येही १ हजार ५१७ कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत़ या कामावर ३ कोटी ९२ लाख रुपये खर्च होणार आहे़ लघुसिंचन पाटबंधारे विभागाकडे २२९ कामे सोपवण्यात आली आहेत़ यामध्ये बहुतांश कामे ही नाला खोलीकरणाची आहेत़ १० कोटी ६५ लाख रुपये या कामासाठी प्रस्तावित करण्यात आल्या आहेत.
वनविभागाची जिल्ह्यात १७५ कामे प्रस्तावित आहेत़ यावर ४ कोटी ९२ लाख रुपये खर्च अपेक्षित आहेत़ जिल्हा परिषदेच्या लघू पाटबंधारे विभागामार्फतही १३१ कामे जलयुक्त शिवारअंतर्गत सुरू आहेत़ ९ कोटी ४५ लाख रुपयांची ही कामे सुरू आहेत़ जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडून १६ कोटी ८ लाख रुपये खर्चून ४४ कामे पाणीपुरवठा योजनेची केली जाणार आहेत़ भूजल सर्वेक्षण विभागाकडून ११ कामांवर ४२ लाख रुपये प्रस्तावित करण्यात आले आहेत़ सामाजिक वनीकरण विभागाकडून १२९ कामे प्रस्तावित आहेत़ या कामावर ८ कोटी ४ लाख रुपये खर्च होणार आहे़ पाटबंधारे विभागाकडून एकच काम जलयुक्त शिवारमध्ये हाती घेण्यात आले आहे़ या कामासाठी ६ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे़ जिल्ह्यात यांत्रिक विभागाकडून ५ कामे केली जात आहेत.