नांदेड : एकेकाळी घरफोडी आणि जबरी चोरीच्या घटनांसाठी जिल्ह्यात कुप्रसिद्ध असलेल्या भाग्यनगर हद्दीत गेल्या सहा महिन्यात पोलिसांनी धडाकेबाज कारवाई केली़ चोरी, जबरी चोरी आणि घरफोडीच्या तब्बल २९ घटना उघडकीस आणत ५० आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत़ त्याचबरोबर गुन्ह्यांना आवर घालण्यासाठी वार्ड रक्षक दले, तुमचा शेजारी खरा पहारेकरी यासारख्या अभिनव संकल्पना राबविण्यात आल्या.
जिल्ह्यात सर्वाधिक चोरी आणि लुटमारीच्या घटना भाग्यनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडत होत्या़ त्यामुळे या ठाण्याच्या हद्दीची विभागणी करुन नव्याने विमानतळ पोलिस ठाणे निर्माण करण्यात आले. परंतु, तरीही या भागातील चोरीच्या घटनांवर आळा घालण्यास पोलिसांना अपयशच येत होते़. त्यामुळे दिवसाही या भागातील नागरीक घराला कुलूप लावून बाहेर जाण्यास धजावत नव्हते़ मात्र गेल्या सहा महिन्यात पोलिसांनी केलेल्या धडक कामगिरीमुळे या भागातील चोरीच्या घटनांमध्ये ९० टक्के घट झाली आहे.
जबरी चोरी, घरफोडीचे २९ गुन्हे उघडकीस आणले आहेत़ पीटा अॅक्टचे दोन, एनडीपीएसचा एक, दारु जप्तीचे सतरा, मटक्याचे सहा, जुगाराचा एक अशाप्रकारे अवैध धंद्यावर पोलिसांनी जरब निर्माण केला़ तर अपहरणाच्या दोन गुन्ह्यांचाही काही तासातच छडा लावला़ चोरीच्या सर्व गुन्ह्यात मिळून ५० आरोपींना अटक करण्यात आली असून १७ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. बुलेटच्या सायरलेन्सरचा आवाज करुन दहशत निर्माण करणा-यांच्या विरोधात विशेष मोहिम उघडून त्यांचा बंदोबस्त करण्यात आला़ श्रीनगर व इतर भागातील खाजगी क्लासेसच्या बाहेर असलेल्या रोडरोमिओंना पोलिसी खाक्या दाखविला़ त्यामुळे छेडछाडीच्या घटनांना आवर बसला़पोनि़ चंद्रशेखर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि चंद्रकांत पवार यांच्या पथकात असलेल्या सुभाष आलोने, सचिन गायकवाड, वैजनाथ पाटील यांनी ही कामगिरी केली़ जिल्ह्यात सर्वाधिक गुन्हे उघडकीस आणण्यामध्ये यंदा भाग्यनगर ठाणे अव्वल ठरले आहे़
उपक्रमांमुळे चोरीच्या घटनात घटपोलीस मित्र, आपला शेजारी खरा पहारेकरी, वार्ड सुरक्षा दलामार्फत भाग्यनगर हद्दीत विविध ठिकाणी पोलिसांनी बॅनर लावले़ त्याचबरोबर पत्रके छापून ती घरोघर वाटली़ त्यामुळे कुठल्याही संशयास्पद गोष्टीची माहिती पोलिसांना मिळू लागली़ वार्ड सुरक्षा दलामध्ये १०० तरुणांचा समावेश आहे़ दहा तरुणांचा एक गट याप्रमाणे हे तरुण आपल्या भागात रात्रीच्या वेळी गस्त घालतात़ त्यामुळे पोलिसांचे काम अधिक सोपे झाले़ या उपक्रमातून नागरीकच खरे पहारेकरी असल्याचा प्रत्यय आला असल्याचे पोउपनि चंद्रकांत पवार म्हणाले.