जिल्ह्यात विक्रमी पाऊस पडला. विविध भागात वारंवार झालेली अतिवृष्टी व त्यातून अनेक छोट्या-मोठ्या नद्या व नाल्यांना आलेला पूर यामुळे पिकांचे नुकसान झाले. त्यासोबतच अनेक गावांमध्ये घरांची पडझड झाली. जनावरांचे गोठे वाहून गेले. अनेक जनावरे दगावली. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला होता. या पार्श्वभूमीवर शासनाकडून मदत मिळावी अशी मागणी होत होती.
शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी शासनाने दोन हेक्टरच्या मर्यादित जिरायती पिकांसाठी प्रतिहेक्टरी दहा हजार तर बारमाही पिकांसाठी प्रति हेक्टरी २५ हजार मदतीची घोषणा केली होती. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळावी यासाठी पालकमंत्री अशोकराव चव्हाण प्रयत्नशील होते. महसूल स्तरावर वारंवार सर्व्हे करुन शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याच्या सूचना प्रशासनास त्यांनी केल्या होत्या.
या सर्व बाबींचा परिणाम म्हणून ९ नोव्हेंबर २०२० रोजी निघालेल्या शासन आदेशानुसार पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना २८४ कोटी तर ७ जानेवारी २०२१ रोजी निघालेल्या नव्या आदेशानुसार दुसऱ्या टप्प्यात २८२ कोटी असे एकूण ५६६ कोटी रक्कम मदत निधी म्हणून प्राप्त झाली आहे. या निधी वाटपाची प्रक्रिया सुरु झाली असून लवकरच ही रक्कम शेतकऱ्यांच्या थेट खात्यावर जमा केली जात आहे.
पालकमंत्री चव्हाण यांच्या प्रयत्नामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणार असून राज्यात नांदेड जिल्ह्याला सर्वाधिक मदत निधी मंजूर झाली आहे. पालकमंत्री चव्हाण यांच्या पाठपुराव्यातूनच ही रक्कम मिळाली आहे.