जिल्हा परिषदेच्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात बदली प्रक्रियेत जिल्हा परिषद अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा परिषद उपाध्यक्षा तथा आरोग्य सभापती पद्मा नरसारेड्डी सतपलवार, शिक्षण व बांधकाम सभापती संजय बेळगे, कृषी व पशुसंवर्धन सभापती बाळासाहेब रावणगावकर, समाजकल्याण सभापती ॲड. रामराव नाईक, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी रावसाहेब कोलगणे, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरे, उपमुख्य लेख व वित्त अधिकारी शेखर कुलकर्णी, शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, माधव सलगर, उपशिक्षणाधिकारी बंडू अबदूरकर, आदींची उपस्थिती होती.
जिल्हा परिषदेच्या अर्थ विभागाअंतर्गत एकूण सात बदल्या करण्यात आल्या. यात कनिष्ठ लेखाधिकारी पदाच्या दोन बदल्या झाल्या. यात प्रशासकीय एक, तर विनंतीवरून एका बदलीचा समावेश आहे. वरिष्ठ साहाय्यक लेखा संवर्गात दोन प्रशासकीय, तर विनंती तीन बदल्या झाल्या.
शिक्षण विभागाच्या वतीने ५७ जणांच्या बदल्या करण्यात आल्या. यात २५ जणांना आदिवासी क्षेत्रात पदस्थापना देण्यात आली; तर आदिवासी क्षेत्रातून इतर तालुक्यांमध्ये १३ आणि विनंतीने १९ बदल्या करण्यात आल्या. यात राजपत्रित मुख्याध्यापक ३, माध्यमिक शिक्षक उर्दू १, माध्यमिक शिक्षक मराठी ३७, शारीरिक शिक्षक १, शिक्षण विस्तार अधिकारी १५ अशा ५७ बदल्या शुक्रवारी समुपदेशनाने करण्यात आल्या. सामान्य प्रशासन विभागाच्या बदली प्रक्रिया उशिरापर्यंत चालूच होत्या.
शासन निर्णयाच्या निकषांनुसार समुपदेशाने पारदर्शक बदली प्रक्रिया पार पाडल्यामुळे कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.