नांदेड : बचत गटाकडून पैसे गोळा करून कार्यालयाकडे निघालेल्या फायनान्स केंद्राच्या व्यवस्थापकाला दुचाकी वाहनावरून आलेल्या दोघांनी गोळीबार करीत भरदिवसा ५७ हजार रुपये लुटल्याची थरारक घटना मंगळवारी दुपारी नांदेड शहरातील मिल्लतनगर भागात घडली. या घटनेने नांदेड शहर पुन्हा एकदा हादरले असून या घटनेने पोलिसांपुढे आव्हान उभे केले आहे.
रोहित गुगले असे लुटल्या गेलेल्या व्यवस्थापकाचे नाव आहे. ते येथील क्रेडिट ॲक्सिस ग्रामीण लि.,मध्ये केंद्र व्यवस्थापक आहेत. मंगळवारी सकाळी आठ वाजता बचत गटाच्या बैठकीसाठी ते गेले होते. तेथून बचत गटाचे ५७ हजार रुपये घेऊन दुचाकीवरून ते आपल्या कार्यालयाकडे जात होते. मिल्लतनगर भागात ते आले असताना पाठीमागून आलेल्या दुचाकीवरील दोघांनी त्यांचा रस्ता अडविला व गुगले यांच्या दुचाकीची चावी काढून घेत देशी कट्ट्यातून समोरील भिंतीवर गोळी झाडली. त्यामुळे गुगले घाबरले. ही संधी साधून लुटारूंनी त्यांच्याकडील ५७ हजार रुपयांची रोकड लुटून पोबारा केला.
घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक नीलेश मोरे, उपअधीक्षक सिद्धेश्वर भोरे, उपअधीक्षक चंद्रसेन देशमुख, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर, इतवाराचे ठाणेदार साहेबराव नरवाडे हे फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांकडून या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली, तेव्हा दुचाकीवरील तोंडाला रुमाल बांधलेले दोन संशयित सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याचे आढळून आले. या संशयितांचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. इतवारा पोलीस ठाण्यात याप्रकरणी वाटमारी व अग्निशस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
नांदेड शहरात गुन्हेगारांनी गोळीबार करण्याचे प्रकार नवीन नाहीत. या गोळीबारामुळे नागरिकांमध्ये कायम दहशतीचे वातावरण पाहायला मिळते. मंगळवारी झालेल्या गोळीबाराच्या घटनेने नांदेड शहर पुन्हा एकदा हादरले आहे. भरदिवसा गोळीबार करून रोकड लुटणाऱ्या या संशयितांना जेरबंद करण्याचे आव्हान इतवारा पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेपुढे निर्माण झाले आहे.