उमरी : तब्बल ३८ वर्षे शिक्षण विभागाची सेवा केल्यानंतर वयाच्या ७५ व्या वर्षी सरपंचपदाच्या रूपाने एस. जी. गायकवाड यांना पुन्हा गावाची सेवा करण्याचा योग प्राप्त झाला. उमरी तालुक्यातील सर्वात वयोवृद्ध सरपंच म्हणून गायकवाड यांची गणना होत आहे.
उपसरपंचपदी गणेश होनशेट्टे यांची निवड झाली. ग्रामपंचायत सदस्य नीळकंठ आनेराये, मंगलबाई डोईकवाड, सुमनबाई होनशेट्टे, गोदावरी आनेराये, विजयमाला होनशेट्टे आदींसह गावातील प्रमुख नागरिक व कार्यकर्त्यांची यावेळी उपस्थिती होती. सन १९४६ साली जन्म झालेल्या एस. जी. गायकवाड यांनी उमरी, सगरोळी येथे प्राथमिक व माध्यमिक शिक्षणानंतर पीपल्स कॉलेज नांदेड येथे महाविद्यालयीन शिक्षण घेतले. १९६५ साली प्रथम नियुक्तीवर गोळेगाव येथे सहशिक्षक म्हणून सेवा केली. यानंतर तळेगाव, मातूळ व परत तळेगाव येथे वरिष्ठ मुख्याध्यापक म्हणून ३१ जानेवारी २००४ साली सेवानिवृत्त झाले. आपल्या सेवाकाळात अनेक शैक्षणिक, सामाजिक प्रकल्प राबवून त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटविला. विज्ञान शिक्षक म्हणून मराठवाडा स्तरावर त्यांची निवड झाली होती. नांदेड जिल्हा परिषदेतर्फे गुरु गौरव पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला होता. सेवानिवृत्तीनंतर गावकऱ्यांनी गायकवाड यांना सरपंच म्हणून काम करण्याची संधी दिली.