नांदेड दक्षिण मतदारसंघातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून आमदार मोहनराव हंबर्डे यांनी आपल्या मतदारसंघातील ग्रामपंचायती बिनविरोध व्हाव्यात यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू केले होते. त्यांनी आपल्या विकास निधीतून बिनविरोध ग्रामपंचायतींना ५ लक्ष रुपयांचा निधी तात्काळ आणि वर्षभरात २० लक्ष रुपयांची विकासकामे करण्याचे जाहीर केले होते.
दरम्यान, विष्णुपुरी येथील ग्रामपंचायत बिनविरोध व्हावी यासाठी महाविकास आघाडीतील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन बिनविरोध निवड करण्यासाठी प्रयत्न केले; परंतु त्यांना १५ पैकी केवळ ८ सदस्य बिनविरोध काढण्यात यश आले. बिनविरोध काढलेल्या सदस्यांमध्ये कविता बालाजी सातपुते, इंदूबाई रामराव हंबर्डे, सुमित्रा रोहिदास कंधारे, जनाबाई गोविंद शंभोले, गायत्री स्वामी हटकर, सत्यभामा संतोष बारसे, प्रतिभा पंडित हंबर्डे, विद्यासागर संजय कांबळे आदींचा समावेश आहे. आता विष्णुपुरी येथील ग्रामपंचायतीची लढत केवळ ७ जागांसाठी होणार आहे. महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी ८ सदस्य बिनविरोध काढले. त्यापैकी सरपंच, उपसरपंच होतील, अशी अपेक्षा आहे.