नांदेड : शहरातील छत्रपती चौक भागात कार्यालय उघडून वन विभाग आणि जिल्हा परिषदेत नोकरी लावतो म्हणून अनेकांना ८२ लाख रुपयांना गंडविण्यात आले़ याप्रकरणी भाग्यनगर पोलीस ठाण्यात दहा जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ २०१४ पासून हा प्रकार सुरु होता़
पूर्णा रोडवर छत्रपती चौक भागात आरोपींनी भारतीय वन विभाग केंद्रशासीत या नावाने कार्यालय उघडले होते़ आरोपी हे भारतीय वन विभागाचे राज्याचे प्रमुख अधिकारी आणि इतर कर्मचारी असल्याचे सांगत होते़ तसेच सर्वांनी केंद्र सरकारकडून नियुक्ती झाल्याचे खोटे दस्तावेज तयार केले होते़ त्यांच्याकडे येणाऱ्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी ते ही कागदपत्रे दाखवित होते़ दिल्लीतील वन विभागातील अधिकाऱ्यांशी ओळख असल्याचे सांगून त्यांनी कमलाकर जायभाये (रा़ नागरवाडी ता़ लोहा) यांच्या मुलासह अन्य दहा जणांना वन विभागात फिल्ड आॅफीसर म्हणून नोकरी लावून देण्याचे आमिष दाखविले़ त्यासाठी सर्वांकडून पैसेही उकळले़ तसेच जायभाये यांच्या नातेवाईकांच्या मुलांना अमरावती आणि यवतमाळ येथील जिल्हा परिषदेत क्लार्क या पदावर नोकरी लावतो म्हणूनही पैसे घेतले़ अशाप्रकारे २०१४ ते २०१६ या काळात आरोपींनी अनेक जणांकडून तब्बल ८२ लाख रुपये उकळले़ नोकरीची विचारपूस केल्यावर मात्र आरोपींकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत होती़
या प्रकरणी जायभाये यांच्या तक्रारीवरुन शामला बालाजी मुळे (रा़ चिखली), शहाजी बालाजी मुळे, मंगला संजय जाधव, सीमा बालाजी मुळे (रा़ भावसार चौक), हेमा मुळे, राकेश सदाशिव धोंडगे (रा़ सटाणा, नाशिक), शिवाजी किशन खांडरे (रा़ हाळदा), राम अण्णाजी घाटे (रा़ पुलगाव, वर्धा), शैलेश आऱ दुबे (रा़ चांदूर रेल्वे) आणि काळे (रा़ अमरावती) अशा दहा जणांविरुद्ध भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़
तक्रारदाराचीच जीप वापरलीआरोपींनी छत्रपती चौकात कार्यालय उघडल्यानंतर तक्रारदार कमलाकर जायभाये यांची स्कॉर्पिओ जीप भाड्याने घेतली होती़ या कारमध्येच ते फिरत होते़ तब्बल दीड वर्ष ही गाडी वापरल्यानंतर त्याचे दहा लाख रुपये भाडेही आरोपींनी दिले नाही़