लोहा नगर परिषदेसाठी ८७ टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 12:04 AM2018-12-10T00:04:03+5:302018-12-10T00:05:53+5:30

सोमवारी सकाळी १० वाजेपासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे़

87 percent polling for the Iron City Council | लोहा नगर परिषदेसाठी ८७ टक्के मतदान

लोहा नगर परिषदेसाठी ८७ टक्के मतदान

Next
ठळक मुद्देआज होणार मतमोजणी काँग्रेस-भाजपामध्येच प्रमुख लढत, चोख पोलीस बंदोबस्त

लोहा : जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या लोहा नगर परिषदेसाठी रविवारी शांततेत मतदानप्रक्रिया पार पडली़ मतदारांनी भरभरुन प्रतिसाद दिल्यामुळे मतदानाची टक्केवारी ८६.७५ पर्यंत गेली होती़ सोमवारी सकाळी १० वाजेपासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे़
लोहा नगरपालिकेतील १७ सदस्य आणि नगराध्यक्षपदासाठी रविवारी मतदान घेण्यात आले़ नगराध्यक्षपदासाठी चार तर नगरसेवकपदासाठी ५४ उमेदवार रिंगणात होते़ तर एकूण मतदारांची संख्या १८ हजार ६०० एवढी होती़ निवडणूक विभागाने मतदानासाठी २८ केंद्र निश्चित केली होती़ त्यावर १२० कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते़ अध्यक्षपदासाठी भाजपाचे गजानन सूर्यवंशी,काँग्रेसचे सोनू ऊर्फ व्यंकटेश संगेवार, बहुजन विस्थापित मोर्चाचे रमेश माळी आणि अपक्ष उमेदवार शिवाजी अंबेकर हे रिंगणात होते़ राष्ट्रवादी आणि शिवसेना यांनी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारच दिला नाही़
त्यामुळे भाजपा आणि काँग्रेसमध्येच सरळ लढत होण्याची चिन्हे होती़ लोहा नगरपरिषदेवर ताबा मिळविण्यासाठी काँग्रेस आणि भाजपाने सर्व शक्ती पणाला होती़ या ठिकाणी आ़ प्रताप पाटील चिखलीकर आणि माजी आ़रोहिदास चव्हाण यांच्या राजकीय कौशल्याचा कस या निवडणुकीत लागणार आहे़ भाजपाकडून प्रदेशाध्यक्ष खा़ रावसाहेब दानवे यांची सभा घेण्यात आली होती़ तर काँग्रेसकडूनही खुद्द खा़ अशोकराव चव्हाण यांनी प्रचाराचा धुराळा उडविला होता़ त्यामुळे या निवडणुकीत चांगलीच रंगत भरली होती़ रविवारी सकाळी मतदानाला सुरुवात झाल्यानंतर सकाळच्या सत्रात मतदारांचा निरुत्साह दिसून आला़
दुपारी चार वाजेपर्यंत फक्त ४३ टक्के मतदान झाले होते़ त्यानंतर मात्र मतदार मोठ्या संख्येने घराबाहेर पडले़ सायंकाळी उशिरापर्यंत मतदान सुरु होते़ मतदानाच्या अंतिम वेळेपर्यंत जवळपास ८७ टक्के मतदान झाले़
मतमोजणीवेळी ७५० पोलीस कर्मचारी तैनात
मतमोजणी प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी पोलीस उपाधीक्षक रमेश सरोदे, पोनि़बालाजी मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली ५० पोलीस अधिकारी, राज्य राखीव दल, केंद्रीय राखीव दल, पोलीस शिपाई, होमगार्ड असे एकूण ७५० कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत़ दरम्यान, रविवारी दिवसभर लोहा शहरात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता़ त्यामुळे अनुचित प्रकार घडला नाही़
मतमोजणीसाठी आठ टेबल
लोहा तहसील कार्यालयात सोमवारी सकाळी १० वाजेपासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे़ आठ टेबलवर ही मतमोजणी होणार आहे़ त्यासाठी २४ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे़ तर एक पर्यवेक्षक व सहाय्यक त्यांच्या मदतीला असणार आहेत़ निवडणूक निर्णय अधिकारी टी़ एस़ बोरगावकर, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विठ्ठल परळीकर, अशोक मोकले हे प्रक्रियेवर लक्ष ठेवून राहणार आहेत़

Web Title: 87 percent polling for the Iron City Council

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.