किनवट : तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत आज तहसील कार्यालयात पार पडली. त्यात नऊ ओबीसी प्रवर्गासाठी सरपंच पद आरक्षित झाले. त्यात पाच महिला व चार पुरुषांसाठी आरक्षण सुटले. १९ ग्रामपंचायतींचे आरक्षण सर्वसाधारण निघाले. त्यात दहा ग्रामपंचायती ह्या महिलांसाठी राखीव आहेत.
तहसील कार्यालयात तहसीलदार उत्तम कागणे यांच्या उपस्थितीत सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत काढण्यात आली. १३४ ग्रामपंचायती असतांना यापूर्वीच १०३ ग्रामपंचायतींचे सरपंचपद अनुसूचित जमातीसाठी राखीव झाले. त्यात ५१ ग्रामपंचायती या अनुसूचित जमाती महिला व ५१ ग्रामपंचायती अनुसूचित जमाती पुरुषांसाठी आरक्षित आहेत.
अनुसूचित जाती महिलेसाठी इस्लापूर, रिठा व चिखली (ई) या तीन ग्रामपंचायतींचे सरपंचपद आरक्षित आहे. मात्र अनुसूचित जाती महिलेसाठी आरक्षित असलेल्या रिठा ग्रामपंचायतीत महिला सदस्य नसल्याने मोठी पंचायत झाली. नामाप्र (ओबीसी) साठी नऊ ग्रामपंचायतींचे सरपंचपद सुटले. त्यापैकी वाळकी (बु), मानसिंग नाईकतांडा, अंबाडीतांडा, गोंडेमहागाव, भिसी ह्या पाच ग्रामपंचायतींचे आरक्षण ओबीसी महिलेसाठी सुटले आहे. तर मरकागुडा, मुळझरा, मार्लागुंडा, अप्पारावपेठ या चार ग्रामपंचायतींचे सरपंचपद ओबीसीसाठी सुटले आहे. १९ ग्रामपंचायतीचे सरपंच पद सर्वसाधारण प्रवर्गासाठी असून दहा ग्रामपंचायतींचे सरपंच पद महिलेसाठी राखीव आहे. ग्रामपंचायतीच्या सरपंच आरक्षण सोडतीची चिठ्ठी कैवल्य मनोज कांबळे या इयत्ता दुसरीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलाने काढली. यावेळी नायब तहसीलदार सर्वेश मेश्राम, कांबळे, नितीन शिंदे यांची उपस्थिती होती.