नरसी फाटा (नांदेड) : ३२ वर्षांपूर्वी झालेल्या जाहीर सभेसाठी राजीव गांधी नरसी फाटा येथे आले होते. नऊ वर्षांचे राहुल गांधीही या सभेस उपस्थित होते. आता भारत जोडो पदयात्रेसाठी बुधवारी राहुल गांधी नरसी फाटा येथे येत असून, या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आहे. राहुल गांधी यांच्याविषयी नरसीकरांत विशेष प्रेम, आदर असल्याने त्यांच्या स्वागतासाठी येथील गावकरी सज्ज झाले आहेत.
१९९१ मध्ये लोकसभा, विधानसभेच्या निवडणुका लागल्या होत्या. त्यावेळी दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांनी महाराष्ट्रात प्रचारसभा घेतल्या होत्या. २० मे १९९१ रोजी नरसीफाटा येथे राजीव गांधी यांची प्रचार सभा झाली होती. त्यावेळी राजीव गांधी हे स्वत: हेलिकॉप्टर चालवीत नरसीफाटा येथे दाखल झाले. हेलिकॉप्टरमुळे मोठी धूळ उडाली होती. त्यामुळे व्यासपीठावर येताच राजीव गांधी यांनी जनतेची क्षमा मागितली. या आठवणी नरसीकरांना आजही ताज्या आहेत. ३२ वर्षांनंतर खासदार राहुल गांधी ९ नोव्हेंबर रोजी सकाळी नरसीनगरीत येत असून, स्वागताची तयारी पूर्ण झाली आहे.
१९ वर्षांचे होते राहुल गांधी वडील राजीव गांधी यांच्यासमवेत आलेले राहुल गांधी हेदेखील सभेस उपस्थित होते. राजीवजींचे चिरंजीव, इंदिरा गांधी यांचे नातू राहुल गांधी यांच्याविषयी उपस्थितांमध्ये त्यावेळी कमालीची उत्सुकता होती. त्यावेळी राहुलजींचे वय केवळ १९ वर्षे ६ महिन्यांचे होते, अशी माहिती नायगाव तालुका काँग्रेसचे अध्यक्ष संभाजी भिलवंडे यांनी दिली.