उमरी : महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश व तेलंगणा आदी राज्यांतील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री सद्गुरू सदानंद बाबा महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळा पुण्यतिथी उत्सवाची पालखी मिरवणूक तब्बल ९५ वर्षांनंतर पहिल्यांदाच यावर्षी खंडित झाली. धार्मिक उत्सवाच्या बाबतीत झालेली उमरी तालुक्यातील ही एक ऐतिहासिक नोंदच म्हणावी लागेल.
कोरोना साथ रोगासंदर्भात शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून उमरी शहरात हा पुण्यतिथी उत्सव फक्त मंदिर व परिसरात साजरा करण्यात आला. श्री सद्गुरू सदानंद बाबा महाराज यांच्या पादुकांचे पूजन, काकड आरती, भजन यानंतर मंदिर परिसरात पालखी काढण्यात आली. बाबा महाराज यांच्या पुण्यतिथी महोत्सवाचा हा ९६ वा उत्सव सोहळा होता. आतापर्यंत संपूर्ण शहरातून पालखी मिरवणूक असंख्य भाविकांच्या उपस्थितीत होत असे. मात्र, यावेळी शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करीत मंदिर परिसरातच हा कार्यक्रम आटोपता घेण्यात आला. तत्पूर्वी, संस्थान अधिपती अरविंद महाराज यांनी उत्सव सोहळ्यातील महाप्रसाद, शहरातून निघणारी पालखी मिरवणूक व यात्रा महोत्सव आदी कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे यात्रा महोत्सव, असंख्य भाविकांसाठी महाप्रसाद, कुस्त्यांचा फड आदी कार्यक्रम रद्द झाले. साध्या पद्धतीने विधिवत पूजा-अर्चा, अभिषेक आदी कार्यक्रम झाले. अशाही स्थितीत फिजिकल डिस्टन्सिंग, मास्क आदी सर्व नियमांचे पालन करून असंख्य भाविकांनी सद्गुरू सदानंद बाबा महाराज यांच्या समाधीचे अत्यंत श्रद्धाभावाने दर्शन घेतले. आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा व महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून असंख्य भाविक मिळेल त्या वाहनाने या उत्सवात सहभागी झाल्याचे दिसून आले. याप्रसंगी संस्थानाधिपती अरविंद महाराज, अंजली महाराज, सुमित जोशी, अश्विनी जोशी, मनोज कोटगिरे, भगवान असावा, नरसिंग मुक्कावार, अनंत राखे, राजेश मुक्कावार, मारुती मुक्कावार, अनंत हेमके, शिवकुमार चाटोरीकर, सुरेश माळवतकर, लक्ष्मण खांडरे, अनिल दर्डा, संतोष चाटोरीकर, दिलीप बिजमवार, दत्तात्रय वारेवार, पुंडलिक पाटील वडजे, किशनराव देवकर, शिवाजी पाटील वडजे, लक्ष्मणराव डोपलवार, सीताराम डहाळे, तुकाराम पेशरवार, शिवाजी हेमके आदींसह असंख्य भाविक महिला, पुरुष यावेळी उपस्थित होते. उत्सव समितीचे पदाधिकारी तसेच स्वयंसेवी भाविक, तरुण उत्सव शांततेत करण्याच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करून पार पाडण्याच्या दृष्टीने परिश्रम घेताना दिसून आले.