नांदेड : दुचाकीने जाणाऱ्या पती-पत्नीच्या अंगावर खाज येणारी पावडर टाकून त्यांच्या हातातील ४ लाख रुपयांची बॅग चोरट्यांनी पळविल्याची घटना नांदेड शहरात घडली आहे. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडलेल्या घटनेने खळबळ उडाली आहे.
हनुमानगड येथील भारती शिवशंकर बडुरे आणि त्यांचे पती शिवशंकर बडुरे हे ३ मे रोजी दुपारी नांदेड शहरात आले होते. नवीन मोंढा भागातील स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेत त्यांचे खाते आहे. या खात्यातून रक्कम काढण्यासाठी बँकेत आले. दुपारी साधारणत: सव्वा वाजण्याच्या सुमारास बँकेतून चार लाख रुपये काढून त्यांनी बॅगमध्ये ठेवले. शिवशंकर बडुरे आणि त्यांच्या पत्नी भारती हे दोघेही दुचाकीने निघाले. वाटे कुठे तरी नाश्ता करावा, या उद्देशाने ते वसंतनगर येथून रस्त्याने जात होते.
तेवढ्यात भारती यांच्या अंगावर काही तरी पावडर पडल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे राजेश फास्ट फूड येथे त्या गाडीवरुन खाली उतरल्या आणि अंगावर काय पडले हे आहे, हे पहात असतानाच दुचाकीने आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या हातातील बॅग हिसकावून घेतली. भारती यांनी आरडा-ओरड केली. मात्र तोपर्यंत चोरटे तेथून पसार झाले. बॅगमधील रोख चार लाख रुपये आणि एक मोबाईल चोरट्यांनी पळविला. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल असून, त्यावरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चोरटे सीसीटीव्हीत कैदवसंतनगर भागातून पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज मिळविले आहेत. या फुटेजमध्ये चोरटे कैद झाले असून, दुचाकीने जात असल्याचे निदर्शनास येत असून, दुचाकी चालविणाऱ्या चोरट्याने टोपी घातलेली आहे.