- राजेश वाघमारे
भोकर : तालुक्यातील रेणापूर येथील तुडुंब भरलेल्या सुधा नदीत पोहण्याचे अतिधाडस दोन मित्रांच्या अंगलट आले आहे. वेगाने वाहणाऱ्या पाण्याचा अंदाज न आल्याने दोन मित्र वाहून गेल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली आहे. घटनेनंतर प्रशासनासह ग्रामस्थांनी शोध मोहीम सुरू केली असून अद्याप त्यांचा शोध लागला नाही. रेणापूर येथील श्रीनिवास भरत मुळेकर (१९) आणि यश संदीप भगत (२०) अशी दोघांची नावे आहेत. या घटनेत इतर तिघे बचवल्याची माहिती आहे.
श्रीनिवास आणि यश हे दोघे गावातीलच अन्य तीन मित्रांसोबत मंगळवारी दुपारी गावालगत असलेल्या सुधा नदीत पोहण्यासाठी गेले होते. यातील एक जण पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने वाहून जात असल्याचे लक्षात येताच दुसऱ्या मित्राने वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु तो सुध्दा वाहून गेला तर अन्य तिघे मित्र मात्र या संकटातून बचावले आहेत. घटनेची माहिती कळताच ग्रामस्थांनी शोध सुरू केला. घटनास्थळी तहसीलदार सुरेश घोळवे, सपोनि शैलेंद्र औटी यांच्यासह महसूल व पोलीस कर्मचारी हजर झाले असून ग्रामस्थ व प्रशासनाच्या वतीने शोध घेण्यात येत आहे. दोन्ही तरुण शेतकरी कुटुंबातील असून श्रीनिवास मुळेकर हा बी.काॅमचे शिक्षण घेत होता. तर यश भगत याने आयटीआय चे शिक्षण पूर्ण केले होते. मागील दोन दिवसांपासून तालुक्यात संततधार सुरू असल्याने नदीनाले तुडूंब भरुन वाहत आहेत. प्रशासनाच्यावतीने सतर्कतेचा इशारा दिला असतानाही काहीजण धाडस करीत असल्याने दुर्दैवी घटना घडत आहेत. दोन तरुण वाहून गेल्याची वार्ता समजताच या घटनेनंतर रेणापूर गावावर शोककळा पसरली आहे.