नांदेड- नांदेडात गोळीबाराच्या घटना सातत्याने घडत आहेत. परंतु बुधवारी चक्क तुरुंगाच्या आवारातच गोळीबार झाला. परंतु हा गोळीबार कुण्या आरोपीने केला नसून पोलिस कर्मचाऱ्याच्याच चुकीने पिस्टलमधून गोळी सुटली. सुदैवाने गोळी भिंतीला लागल्याने अनर्थ टळला. ही घटना सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास घडली.
पोलिस मुख्यालयातील दोन कर्मचारी एका आरोपीला लोहा न्यायालयात हजर करण्यासाठी तुरुंगात गेले होते. यावेळी त्यांच्यासोबत पोलिस उपनिरिक्षक देवकते हे होते. तुरुंगात जाण्यापूर्वी जवळील मोबाईल, पिस्टल बाहेर ठेवावी लागतात. त्यानंतर देवकते यांनी आपल्या जवळील पिस्टल बाहेर थांबविलेल्या एका कर्मचार्याच्या हातात दिले. वॉरंट घेवून ते जेलमध्ये गेले. यावेळी कर्मचार्याने हे पिस्टल हाताळताना अचानक त्यातून गोळी सुटली. त्यामुळे सर्वत्र एकच गोंधळ उडाला. ज्या कर्मचार्याच्या हाती पिस्टल होते तो ही गोंधळून गेला. सुदैवाने ही गोळी भिंतीला लागली. त्यामुळे अनर्थ टळला. ही बाब कळाल्यानंतर तुरुंग अधीक्षक सोनवणे यांनी वरिष्ठांना याबाबत माहिती दिली. परंतु या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली होती.