हदगाव: नव्यानेच हदगाव ठाण्यात रुजु झालेले पोलिस निरीक्षक सदाशिव भडीकर यांचेवर रात्री उशीरा पोलीस पाटील यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. मयताचे नातेवाईकांनी पोलिस निरीक्षक यांचेवर गुन्हा दाखल केल्याशिवाय मृतदेहाची ऊत्तरीय तपासणी करु दिली नव्हती. त्यामुळे पोलिसांसमोर मोठा पेच निर्माण झाला होता. अखेर गुन्हा दाखल झाल्यानंतर नातेवाइकांनी शवविच्छेदनास परवानगी दिली. त्यानंतर मृतदेह ताब्यात घेतला.
११ जुलै रोजी गावात हाणामारीत एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. त्यामध्ये ४ आरोपी होते त्यापैकी दोघांना अटक करण्यात आली होती व दोन आरोपी फरार होते. याच तपासकामी पोलीस पाटील बालाजीराव जाधव पोलीसांना मदत करीत नाहीत उलट ते आरोपीचे नातेवाईक असल्याने त्यांना पाठीशी घालत आहेत, असा आरोप पोलिस निरीक्षक सदाशिव भडीकर यांनी जाधव यांच्यावर केला होता. तुमचा अहवाल जिल्हाधिकारी यांना पाठवू असेही ते म्हणाले होते. याच दबावामुळे आणि आपली नोकरी जाईल व आपल्यावर गुन्हा नोंद होईल या भितीपोटी पोलिस पाटील जाधव यांनी आत्महत्या केली, अशी फिर्याद मुलगा अनिकेत बालाजीराव जाधव यांनी दिली.
या फिर्यादीवरून पोलीस निरीक्षक सदाशिव भडीकर यांचेवर कलम १०८ भारतीय न्याय संहीता नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपविभागीय अधिकारी डँनियल बेन हे करीत आहेत. दरम्यान, आज सकाळी शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. पेवा या गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत जाधव हे पोलिस पाटील सघटनेचे सचिव होते.